
‘श्रीपाद सेवा मंडळ’ आणि ‘श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन’ व ‘श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ प्रकल्प’ यांच्या संयुक्त विद्यमाने युवा साधकांचे शिबिर शनिवार व रविवार, दिनांक २२ व २३ जून २०२४ असे दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आले होते. आळंदी येथे श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालयाच्या वास्तूत प.पू. सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा आगटे यांच्या परममंगल उपस्थितीत हे शिबिर अत्यंत उत्साहाने व आनंदाने संपन्न झाले.
महाराष्ट्र व गोव्यातील विविध केंद्रांतून अनेक युवा साधक बंधुभगिनी या शिबिरासाठी एकत्र जमले होते. शनिवारी दुपारी ठीक ३.३० वाजता प.पू. सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन शिबिराला सुरुवात झाली. प्रारंभी श्री.शेखर आदमणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर प.पू. सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी शिबिर घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. “विविध केंद्रांतील नवीन साधकांना आपल्या संप्रदायाचा परिचय व्हावा, साधक बंधुभगिनींची परस्परांशी ओळख व्हावी, परमार्थासाठी वेळ देण्याचे महत्त्व लक्षात यावे, साधना करण्याच्या निश्चयाला बळ मिळावे यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. शिबिराच्या ह्या दोन दिवसांत येथे जमलेल्या साधकांनी परमार्थासंबंधी अधिकाधिक चर्चा करावी, मोबाईलचा अनावश्यक वापर कटाक्षाने टाळावा!” असे त्यांनी या वेळी सांगितले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी आपापला परिचय करून दिला. सायंकाळी ४.०० वाजता प.पू. सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या समवेत सामुदायिक साधनेला सुरुवात झाली. साधनेनंतर चहापान होऊन ठीक ५.३० वाजता प्रवचन सेवेला सुरुवात झाली. प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी प.पू. सद्गुरु श्री.मामांनी रचलेल्या ‘श्रीदत्तभावांजली’ या महन्मंगल स्तोत्रकाव्याच्या ‘मंगलाचरणा’च्या किंवा ‘नमना’च्या संदर्भात अत्यंत रसाळ, भावमधुर असे विवरण केले.

या वेळी त्यांनी ‘श्रीदत्तभावांजली’चे माहात्म्य व प.पू. सद्गुरु श्री.मामांची थोरवी सांगून, या महन्मंगल स्तोत्रकाव्याच्या निर्मितीची कथा, याच्या पठणाने प्राप्त होणारे फल याविषयी अतिशय सुंदर निरूपण केले. ‘श्रीदत्तभावांजली’ या शीर्षकामधील ‘श्री’ म्हणजेच पराशक्ती, कुंडलिनी शक्ती होय. ‘या भगवती शक्तीला भावांची ओंजळ अर्पित करणे’ असा याचा एक अर्थ असून, ‘श्रीदत्त म्हणजेच सद्गुरुतत्त्व; ते अनुभवाला आणून देणारे महाकाव्य’ असाही त्याचा आणखी एक अर्थ त्यांनी सांगितला. प्रवचन सेवेनंतर आरती व मंत्रपुष्प संपन्न झाले.
त्यानंतर उपस्थितांमधील काही साधक बंधुभगिनींच्या अभंग- गायनसेवेचा अतिशय सुंदर कार्यक्रम पूर्वनियोजित नसतानाही अप्रतिम सादर झाला. ‘माझी देवपूजा’, ‘अमृताहुनी गोड’, ‘दावा नयनी यशोदेचा सुकुमार’, ‘आनंदाचा कंद’, ‘भुलविले वेणुनादे’, ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’, ‘विष्णुमय जग’, ‘नाम कस्तूरीचे’ असे काही सरस अभंग या वेळी सादर करण्यात आले. या वेळी ही सुमधुर गायनसेवा श्रीसद्गुरुचरणीं अर्पण करणाऱ्या सर्व कलाकारांचे प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी कौतुक केले. तसेच पुस्तक- चर्चेमध्येही सर्वांनी असाच उत्साहाने सहभाग घ्यावा असे त्यांनी सांगितले.
भोजनोत्तर पुस्तक चर्चा सुरू झाली. प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी या प्रसंगी असे सांगितले की, श्री वासिष्ठ महामुनींनी प्रभू श्रीरामचंद्रांना योगवासिष्ठमध्ये केलेल्या उपदेशात भगवत्प्राप्तीचा जो मार्ग सांगितला आहे त्यात ‘मनोनाश’, ‘वासनाक्षय’ आणि ‘तत्त्वज्ञानाचा अभ्यास’ या तीन महत्त्वाच्या मुद्यांचा विचार सांगितला. यांतील पहिले दोन भाग हे साधना केल्याने साधतात; पण तत्त्वज्ञानाचा अभ्यास मात्र आपल्याला करावाच लागतो. त्याशिवाय परमार्थात पुढे जाता येत नाही !” त्यानंतर त्यांनी उपस्थित साधकांना ‘साधना पाथेय’, ‘साधना सर्वस्व’, ‘तरि गा ऐसें करीं’, ‘तो महासुखाचा निमथा पावे’, ‘अभ्यासदर्शन संच’ या ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या ग्रंथांच्या वाचनातून आपल्याला समजलेला भाग सर्वांसमोर मांडण्यास सांगितले. पुणे-मुंबई केंद्रांव्यतिरिक्त अन्य केंद्रांतून आलेल्या साधकांनी यात आवर्जून सहभाग घ्यावा असेही ते म्हणाले. या सत्रात साधकांनी आपल्या भाषेत ‘यम-नियम, आसन, कर्मसाम्यदशा, सत्शिष्यांची लक्षणे’ यांविषयी पुस्तकांतून स्पष्ट केलेले आणि आपल्याला समजलेले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. या वेळी प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी देखील सर्वांच्या अनेक तात्त्विक मूलभूत संकल्पना सुस्पष्ट केल्या. मन, वासना, इंद्रिये यांतील परस्पर संबंध याविषयी विवरण केले. “अभ्यास करताना, प्रवचनकारांनी काय सांगितले आहे हे समजून घेताना, स्वतःला प्रश्न विचारून त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा, त्यावर चिंतन करावे. त्यायोगे अभ्यासाला खोली येईल. रोज नियमाने एखाद्या पुस्तकाचे किमान एखादे पान किंवा एक परिच्छेद तरी वाचावा!” असेही त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले. रात्री ठीक १०.०० वाजता प्रथम सत्राची सांगता झाली. परगांवच्या मंडळींची निवास व्यवस्था आळंदी येथेच करण्यात आली होती तर पुण्याचे साधक आपापल्या घरी रवाना झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या समवेत सामुदायिक साधना संपन्न झाली. त्यानंतर नाष्टा, चहापान करून ९.१५ वाजता ‘श्रीस्वामीसमर्थ नामपाठ’, ‘श्रीदत्तभावांजली’चे सामुदायिक पठण, ‘दिगंबरा दिगंबरा…’ व ‘जय जय करुणामूर्ति दयाळा…’ हे दोन्ही नामजप मोठ्या उत्साहाने संपन्न झाले. त्यानंतर सर्वांनाच प्रवचन ऐकण्याची अत्यंत आतुरता होती. सकाळी ठीक १०.४५ वाजता प.पू. सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या प्रवचनसेवेस प्रारंभ झाला. या वेळी त्यांनी ‘श्रीगजानन’, ‘गौरीनंदन’, ‘ज्ञानभास्कर’, ‘स्फूर्ती’, ‘सुयश’, ‘कल्याण’ अशा या नमनातील शब्दांचे प्रयोजन, त्यांचे अर्थ आणि पैलू उलगडून सांगितले. श्रीशारदादेवींची महती, त्यांच्या कृपेने प्राप्त होणारा वाग्विलास या संदर्भातही त्यांनी सुंदर दाखले दिले. ‘सत्काव्य’ कशाला म्हणावे, तसेच ‘नवप्रतिभेची चार फुले’ म्हणजे ‘ज्ञान’, ‘वैराग्य’, ‘भक्ती’ आणि ‘प्रेम’ असे त्यांनी विशद करून सांगितले. सर्वांनाच भारावून टाकणाऱ्या या प्रवचनसेवेनंतर आरती संपन्न झाली.
समारोपाच्या वेळी प.पू. सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी पुन्हा एकदा शिबिराची उद्दिष्टे स्पष्ट केली. “यानिमित्ताने सामुदायिक साधना होते तसेच संप्रदाय परिचय घडतो, प्रवचनांद्वारे आपल्या अंतःकरणात परमार्थाची थोडी तरी रुची उत्पन्न होते !” असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी प.पू. सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंचे उदाहरण देऊन सद्गुरुसेवेचे माहात्म्य यावर मार्गदर्शन केले. शिबिराच्या अविस्मरणीय स्मृती हृदयात साठवत सर्व साधक मंडळी अंतर्मुख होऊन, नियमित साधनेचा निश्चय करीत आपापल्या स्थानी परतली.