
॥ श्री ॥
श्रीदत्तधाम, वर्धा येथे संपन्न झालेल्या सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांच्या संजीवन समाधी महोत्सवाचा वृत्तांत
विदर्भ ही प्रज्ञावंतांची तसेच संतांची प्रिय भूमी. श्रीभगवंतांची सुद्धा ही अत्यंत प्रिय भूमी आहे, कारण हे त्यांचे श्वशुरगृह आहे. वर्धा जिल्ह्यातील कौण्डिण्यपूर हे श्रीरुक्मिणीदेवींचे माहेर. अशा या पावन प्रदेशातील वर्धा नगरीमध्ये कारला नावाच्या छोट्याशा गावात एक सुबकशी टेकडी आहे. अत्यंत शांत, रमणीय अशा या परिसरात प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांच्या संकल्पाने आणि त्यांच्याच कृपेने भव्य असे भगवान श्रीदत्तात्रेयांचे मंदिर व एक सभागृह निर्माण करण्यात आले आहे. गतवर्षीच प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या पावन करकमलांनी येथे श्रीदत्तप्रभूंच्या अष्टधातुमय एकमुखी मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. जयपुरी दगडातील अष्टकोनी गर्भगृह, प्रशस्त सभामंडप, नक्षीदार गवाक्षे व भव्य असा नक्षीदार लाकडी दरवाजा; मंदिरासमोर सुबक, उंच दीपमाळ; बाजूला असणाऱ्या ‘श्रीसंत मामासाहेब देशपांडे सभागृहा’त प.पू.सद्गुरु योगिराज श्री. मामा महाराज व प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईमहाराज यांच्या भव्य तसबिरींबरोबरच भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची सजीव भासणारी मूर्ती विराजमान आहे. निसर्गरम्य व पवित्र अशा या स्थानी साहजिकच अभ्यागतांची मने प्रसन्न होतात. याच परिसरात श्रीसद्गुरुकृपेने सोमवार आणि मंगळवार, दिनांक १७ व १८ नोव्हेंबर २०२५ असे दोन दिवस या वर्षीचा सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी सोहळा अत्यंत उत्साहाने व आनंदाने संपन्न झाला. त्यानिमित्ताने साधकांसाठी कृपायोग-शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते.
संक्षिप्त चलतचित्र
रविवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा व प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांचे शिबिरस्थानी आगमन झाले. त्यांनी प्रकल्पस्थानी फिरून संपूर्ण परिसराची पाहणी केली व महोत्सवाच्या तयारीचा आढावाही घेतला. दुपारपासूनच शिबिरस्थानी साधकांच्या आगमनाला सुरुवात झाली होती. भगवान श्रीदत्तात्रेयांच्या मंदिरात फुलांची नयनमनोहर आरास करण्यात आली होती. मंदिराच्या प्रांगणातही विलोभनीय रांगोळ्या काढून सुरेख पुष्पसज्जा करण्यात आली होती. ‘श्रीसंत मामासाहेब देशपांडे सभागृहा’तील मंचसज्जा व आसनव्यवस्थाही देखणी झालेली होती. ‘श्रीवामनराज प्रकाशना’चा ग्रंथविक्रीचा स्टॉलही उत्तम सजवला होता.
सोमवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ठीक चार वाजता श्री हरिपाठ-गायनसेवेने शिबिराचा शुभारंभ झाला. ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजराने सारा आसमंत निनादून गेला. या कार्यक्रमानंतर प.पू.सद्गुरु श्री. अनिरुद्धदादांची प्रवचन-सेवा झाली.
श्री ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातील ही ओवी त्यांनी सेवेकरिता घेतली हाेती. सर्व साधकवृंद जिवाचे कान करून त्यांचे निरूपण ऐकत होता. ‘अवधान’ म्हणजे काय ? हे समजावून सांगून, त्या शब्दाच्या अनेक अर्थच्छटा प.पू.श्री. अनिरुद्धदादांनी सोदाहरण स्पष्ट केल्या.
सद्गुरु श्री माउली असे कोणाला उद्देशून बोलत आहेत ? तर त्यांचे सद्गुरु श्री निवृत्तिनाथ महाराज, अनेक अधिकारी संत आणि ऋषिमुनी हे तिथे श्रोते म्हणून उपस्थित आहेत. पुढल्याच ओवीत श्री माउली ‘सलगीची विनवणी’ असा शब्द योजतात. आपल्या समोर असणाऱ्या ज्येष्ठ, भगवत्स्वरूप श्रोत्यांना ते प्रेमाने विनंती करतात की, ‘‘माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकावे !’’ सद्गुरु श्री माउलींनी अशी प्रतिज्ञाच केली आहे की, ‘‘जर अवधान देऊन हा ग्रंथ श्रवण केला तर श्रोते ब्रह्मसुखाला पात्र होतील !’’ या प्रतिज्ञेची सुरुवात सहाव्या अध्यायातच झालेली आहे. तेच म्हणणे श्री माउली नवव्या अध्यायात अधोरेखित करतात. असे ‘अवधान देणे’ जर साधले तर तो शब्द सर्वही पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून अनुभवला जाऊ शकतो. ‘शब्द’ हा विषय जरी कानांनी ऐकण्याचा असला तरी रसना म्हणते हा माझाच विषय आहे. डोळे म्हणतात हा आमचाच विषय आहे. अशी सर्व इंद्रिये त्या शब्दाचे सुख भोगतात. ‘‘असे शब्द मी घडवीन !’’ अशी प्रतिज्ञा सद्गुरु श्री माउलींनी सहाव्या अध्यायातच केलेली आहे.
या सहाव्या अध्यायातील ओवीचेही या प्रसंगी प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी अतिशय बहारदार विवेचन केले. सद्गुरु श्री माउलींच्या अमोघ, कृपापूर्ण, लावण्यमय शब्दसामर्थ्याचे हे आराधन ऐकता ऐकता प्रवचन कधी पूर्ण झाले ते कळलेही नाही. श्रोत्यांनी आपली बैठक मोडली ती दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनाची उत्कंठा मनात ठेवूनच !
प्रवचनानंतर प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांनी साधकांच्या परमार्थविषयक शंकांचे समाधान केले. कर्माचा सिद्धांत, त्यांची कारणे, हेतू, कर्मभोगांची कारणे, परिणाम, त्या संदर्भात ग्रहांची भूमिका अशा अनेक मुद्द्यांचा परामर्श घेऊन त्यांनी या विषयावर विस्तृत विवेचन केले. त्यानंतर आरती होऊन पुण्यकाळ साजरा झाला.
रात्री नऊ वाजता विदर्भातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प.श्री.दिगंबरबुवा नाईक यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. ‘आपुलिया हिता । जो असे जागता ।’ हा श्रीसंत तुकाराम महाराजांचा अभंग त्यांनी निरूपणाला घेतला होता. उत्तररंगात त्यांनी हरिभक्त हरिपालाचे आख्यान लावले. अतिशय रंगलेल्या या कीर्तनसेवेने उभय सद्गुरु अतिशय प्रसन्न झाले. प.पू.सद्गुरु श्री. शिरीषदादांच्या पावन हस्ते ह.भ.प.श्री.दिगंबरबुवा नाईक यांचा मानधन, शाल, श्रीफळ-प्रसाद देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
मंगळवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजीही सकाळी ७ ते ८ या वेळेत सामुदायिक साधनेने कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर स्वादिष्ट अशा अल्पोपाहाराचा आस्वाद घेऊन सर्व शिबिरार्थींनी सभागृहात दाटी केली. ठीक साडेनऊ वाजता श्री हरिपाठ-गायनसेवा सुरू झाली. टाळ-मृदंगांच्या घोषात श्री हरिपाठाचे श्रवण करताना उपस्थित साधकांची मने तल्लीन झाली. अशा सावध, शुद्ध झालेल्या अंतःकरणाने आपले सारे अवधान एकवटून श्रोते प.पू.श्री.अनिरुद्धदादांचे प्रवचन ऐकायला सिद्ध झाले. आदल्या दिवशीच्या विषयाचा धागा पकडून पुढच्या विवेचनाला सुरुवात झाली. प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी श्रवणाचे महत्त्व, यमनियमांची आवश्यकता, नियमित साधनेने मिळणारा अधिकार अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करत शेवटी सर्वांना एकच निरोप दिला की, ‘‘जर सर्वसुखाला पात्र व्हायचे असेल तर सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे नियमितपणे व प्रेमाने, तळमळीने साधन केले पाहिजे !’’ जिवाचे कान करून प्रवचन ऐकणारे श्रोते साहजिकच त्यायोगे अंतर्मुख झाले. त्यानंतर पुन्हा प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांनी शंका-समाधानाचे सत्र संपन्न केले. त्यात त्यांनी सांगितले की, आपले साधन प्रामाणिकपणे करत असताना जर त्यात काही अडले तर सद्गुरूंकडून शंका-निरसन करून घ्यावे. आपली आजची स्थिती काय आहे ते बघून त्याप्रमाणे प्रश्न विचारावेत. सर्व साधक मंडळींना या सत्रातून जणू प.पू.श्री.दादांचे प्रवचन ऐकण्याचाच आनंद लाभला.
त्यानंतर आरती, सद्गुरुदर्शन व तीर्थप्रसाद झाला. महाप्रसादाच्या मंडपात सर्व साधक-बंधुभगिनींचे आनंदाने, खेळीमेळीने भोजन झाले. वैदर्भीय पाकसिद्धीवर आणि शिबिराच्या एकूण सर्वच व्यवस्थेवर अभ्यागत साधक अत्यंत खूश होते.
संध्याकाळी चार वाजता सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींची व सद्गुरुपरंपरेची अशा दोन्ही प्रतिमा आणि प.पू.सद्गुरु श्री.मामांच्या पादुका विराजमान असलेली सुशोभित पालखी सोहळ्यासाठी सज्ज होती. प.पू.सद्गुरु श्री.दादांनी स्वतः रूपाचा अभंग गाऊन पालखी-सोहळ्याला सुरुवात केली. भगवान श्रीदत्तप्रभूंचे तेजःपुंज, प्रसन्न रूप बघून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रूंनी दाटी केली होती. रांगोळ्यांनी सुशोभित केलेल्या प्रशस्त अशा प्रदक्षिणामार्गावरून टाळ-मृदंगांच्या गजरात, सुंदर पावली करत साधकवृंद पालखी-सोहळ्यात सहभागी झाला होता. या वेळी गायिलेल्या अभंगांनी व पदांनी सर्वांचेच कान आणि मने तृप्त झाली. अवर्णनीय असा तो दिव्य-पालखी सोहळा सर्वांच्याच मनांत भरून राहिला. मावळतीला कललेल्या सूर्यानेही त्या वेळी सद्गुरु श्री माउलींच्या पालखीवर आपल्या सोनेरी, तांबूस किरणांचा वर्षाव केला. त्यानंतर आरती होऊन तीर्थप्रसादाने शिबिराची सांगता झाली. मंदिरातील भगवान श्रीदत्तप्रभूंच्या चर्येवरचे प्रसन्न हास्य लपत नव्हते, असा अनुभव सर्वांनाच देवदर्शन घेताना येत होता. अत्यंत तेजस्वी, प्रसन्न, करुणामय असे ते श्रीभगवंतांचे रूप नेत्रांत साठवून सर्वांनी आपापल्या मुक्कामी प्रस्थान केले ते पुढील वर्षीच्या उत्सवाची ओढ मनात ठेवूनच !
उत्सवातील काही क्षण चित्रे
