

॥ श्री ॥
श्रीक्षेत्र आंबेरी येथे झालेल्या भगवान श्रीकृष्ण जयंती व सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जयंती महोत्सवाचा वृत्तांत

श्रावण कृ.८ व ९, शुक्रवार व शनिवार दिनांक १५ व १६ ऑगस्ट २०२५, असे दोन दिवस ‘प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तपोवन, श्रीक्षेत्र आंबेरी’ येथे भगवान श्रीकृष्णांच्या व सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीचा आणि गोपाळकाल्याचा महोत्सव प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा व प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या पावन उपस्थितीत संपन्न झाला.
संक्षिप्त चलतचित्र
प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा व प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा या दोघांच्या मार्गदर्शनानुसार महोत्सवासाठी आवश्यक ती सर्व तयारी आंबेरी येथील पूर्णवेळ निवासी असणाऱ्या साधकांनी तसेच विविध केंद्रांमधून सेवेसाठी आलेल्या स्वयंसेवकांनी अगोदरच करून ठेवली होती. ‘तपोवन’ परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला होता. संपूर्ण परिसरात स्वच्छतेची विशेष काळजी घेतलेली दिसून येत होती. फळा-फुलांची विविध झाडे, वाऱ्याने डुलणारी भातशेते, कृष्णतुळशीची बहरलेली रोपे, शेतातून खळखळणारा पाण्याचा प्रवाह आणि तुडुंब भरलेली पुष्करणी यामुळे वातावरण अधिकच प्रसन्न झाले होते. अधूनमधून बरसणाऱ्या श्रावणसरी निसर्गरम्य वातावरणात एक वेगळीच मोहकता निर्माण करत होत्या.
संपूर्ण मुख्य मंदिर आकर्षक पुष्पसजावटीने सुशोभित करण्यात आले होते. देवांच्या जन्मकाळासाठी सुगंधी फुलांनी सजवलेला पाळणा अत्यंत देखणा दिसत होता. गर्भगृहातील झुंबरांच्या प्रकाशात सभोवती फुलांची आरास केलेली श्रीभगवंतांची विलोभनीय मूर्ती दिव्यतेचा झळाळता साज लेऊन उभी होती. ‘श्रीचरणाधिष्ठान मंदिर’, व ‘श्रीनाथ मारुती मंदिर’ येथेही फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती. संपूर्ण ‘तपोवन’ परिसर जणू गोकुळ होऊन श्रीभगवंतांच्या आगमन-सोहळ्यासाठी सज्ज झाला होता. ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या विविध केंद्रांतील निमंत्रित साधक या विशेष सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पस्थानी महोत्सवाच्या दिवशी सकाळीच उपस्थित झाले होते.
या वर्षी महोत्सवासाठी प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताईंच्या पादुका श्रीचरणाधिष्ठान मंदिरातून पालखीतून श्रीभगवंतांच्या मंदिरात आणण्यात आल्या. श्रीचरणाधिष्ठान मंदिरात प.पू.सद्गुरु सौ. ताईंची पालखी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती. सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी टाळकऱ्यांनी ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे’ हा जप सुरू केला. या जपाने मंदिर दुमदुमून गेले. साधारण पंधरा मिनिटांच्या अखंड जपानंतर प.पू.सद्गुरु सौ.ताईंची प्रतिमा आणि त्यांच्या पादुका प.पू.सद्गुरु श्री. अनिरुद्धदादांनी पालखीमध्ये ठेवल्या. पादुकापूजनानंतर, ‘राधे कृष्ण, गोपाळ कृष्ण’ या गजरात पालखीचे मंदिरातून प्रस्थान झाले.
आघाडीला टाळकरी, मधोमध पालखी आणि मागे सर्व साधक-सद्भक्त अशा क्रमाने नामसंकीर्तन करीत टाळ-मृदंगांच्या घोषात सर्वजण मुख्य मंदिरात पोहोचले. वरुणराजानेही आपली संतत धार थांबवून पालखी श्रीभगवंतांच्या मंदिरात पोहोचेपर्यंत विश्रांती घेतली ही देवांचीच कृपा ! नामघोष आणि पावन, गंभीर असा शंखनाद होत असताना पालखीचे मुख्य मंदिरात आगमन झाले. तेथे पाच सुवासिनींनी प.पू.सद्गुरु सौ.ताईंच्या पादुकांना ओवाळले व पादुका मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात विधिवत् विराजमान झाल्या.
श्रीकृष्णजन्माष्टमीचा उपवास असल्याने आलेल्या सर्व निमंत्रितांसाठी सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा तिन्ही वेळची फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.
सायंकाळी ४ वाजता दुसऱ्या सत्राची सुरुवात श्रीहरिपाठ-गायनसेवेने झाली. साधकबंधूंच्या भावभक्तियुक्त हरिपाठ-गायनाला वादकांनी व टाळकऱ्यांनी उत्साहाने सुंदर साथ केली. या सेवेने सर्व वातावरण अत्यंत शांत, प्रसन्न आणि भक्तिमय झाले.
चहापानाच्या विश्रांतीनंतर संवादिनी व तबला-वादनसेवेस सुरुवात झाली. संवादिनी वादनामध्ये केवळ पंधरा वर्षे वयाच्या कु.सुधन्वा कुलकर्णी यांनी रागेश्री राग व काही अभंग सादर केले. त्यांना श्री.संकेत खलप यांनी तबल्याची साथ केली. त्या पाठोपाठ चिपळूण येथील ज्येष्ठ साधक श्री.राजाभाऊ शेंबेकर यांची दमदार गायन-सेवा झाली. त्यांनी ‘जेथूनि उद्गार प्रसवे ॐकार’, ‘गुरु माझा जीवाचा जीवन’, ‘पैल मेरुच्या शिखरी’, ‘परब्रह्म निष्काम तो हा’, ‘तारील कवण तुजवीण वासुदेवा’ इत्यादी अभंग सादर केले. त्यानंतर मुंबईच्या साधकभगिनी सौ.अपर्णा देवधर यांनी अत्यंत श्रवणीय अशी सतार-वादनसेवा भगवच्चरणीं रुजू केली.
अल्पोपाहारनंतर कु.शाल्मली भालेराव यांची सुश्राव्य गायन-सेवा झाली. सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे ‘ॐ नमो जी आद्या’, ‘कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु’, ‘घनु वाजे घुणघुणा’ हे अभंग; श्रीसंत सूरदास महाराजरचित ‘निसदिन बरसत नैन हमारे’ तसेच श्रीसंत मीराबाई यांच्या ‘म्हाराँ री गिरिधर गोपाल’, ‘पायोजी मैंने रामरतन धन पायो’ या रचना त्यांनी सादर केल्या. दोन्ही गायक कलाकारांच्या सुश्राव्य गायनास लाभलेली वाद्यवृंदाची साथ ही देखील मंत्रमुग्ध करणारी होती. तबलावादक श्री.संकेत खलप व पखवाजवादक श्री. मनोज भांडवलकर यांनी आपल्या ताकदीच्या वादनाने वातावरण भारावून टाकले. संवादिनीवर श्री.विजय उपाध्ये व टाळांची साथ देणारे श्री.सुश्रुत चितळे यांनीही या सेवेत सुंदर रंग भरले. या बहारदार संगीत-सेवेने उपस्थित सर्वांच्या हृदयात भक्तिरस दाटून आला. या सर्व कलाकारांना कार्यक्रमानंतर श्रीभगवच्चरणीं सेवा रुजू केल्याबद्दल प.पू.सद्गुरु श्री. शिरीषदादांच्या हस्ते मानधन तसेच पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ प्रसाद देण्यात आला.
रात्रीच्या अल्पोपाहारानंतर प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांची जन्मकाळाची प्रवचन-सेवा झाली.
या श्री ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातील आठव्या श्लोकावरील छप्पन्नाव्या ओवीने प.पू.सद्गुरु श्री.दादांनी जन्मकथेस सुरुवात केली. ‘‘ ‘परित्राणाय साधूनां’, ‘विनाशाय च दुष्कृताम्’, ‘धर्मसंस्थापनार्थाय’ या मुख्य कारणांसाठी भूदेवीला (पृथ्वीला) पापाचा व अभक्तांचा झालेला भार हलका करण्यासाठी भगवंत अवतार घेत असतात. महाशिव, महाविष्णू, गणेश, सूर्य व भगवती ही त्यांचीच रूपे आहेत. या पाच रूपांशिवाय द्वापरयुगात त्यांनी घेतलेला श्रीकृष्ण अवतार हा परिपूर्ण अवतार आहे. याचे कारण जेव्हा निर्गुण निराकार परब्रह्म प्रथम संकल्प करून सगुण रूपात आले, तेव्हा जे रूप प्रकटले तेच श्रीकृष्ण रूप होय.’’
प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांनी आपल्या रसाळ वाणीने भगवान श्रीकृष्णांच्या मंगल जन्मकथेचे अनुपमेय असे वर्णन केले. त्यांनी ‘श्रीमद् भागवत’, ‘गर्गसंहिता’ आणि श्रीसंत नामदेव महाराजांचे अभंग यांचे संदर्भ देऊन अद्भुत व दिव्य असे जन्मकथेचे रसाळ निरूपण केले. भगवंतांची जन्मकथा विचारणारा, सांगणारा तसेच ऐकणारा अशा सर्वांनाच महद्पुण्य लाभ होतो, असेही या प्रसंगी प.पू.श्री. दादांनी सांगितले. जन्मकाळाच्या प्रवचनकथेदरम्यान त्यांच्या साथीदार साधकबंधूंनी श्रीकृष्ण जन्मकथेच्या प्रत्येक टप्प्याला साजेसे असे विविध संतांच्या अभंगांचे आणि पदांचे सुरेल गायन केले.
आपल्या संप्रदायानुसार, श्रीभगवंतांचे गोकुळात नंदबाबांच्या घरी झालेले आगमन हा त्यांचा मंगल असा जन्मकाळ असल्याची मान्यता आहे. ‘गौळण सांगे गौळणीला, पुत्र झाला यशोदेला’ या अभंगाच्या गायनाने व संवादिनी, तबला, पखवाज, झांजा, टाळ, घंटा आणि शंख या सर्व वाद्यांचा एकत्रित गजर करीत भगवान श्रीकृष्णांचा आणि सद्गुरु श्री माउलींचा जन्मकाळ उत्सवपर्व साजरा करण्यात आला. मंदिर आणि सभागृहात प्रसन्नता आणि आनंदाची लहर पसरली होती. मंदिरासमोरील दीपमाळ उजळली, कारंजी आनंदाने नाचू लागली, हा क्षण इतका विलक्षण दिव्य होता की प्रत्येक साधकाला आपणही प्रत्यक्ष गोकुळातच असल्याचा अवर्णनीय आनंद होत होता.
जन्मकाळाच्या पूजाविधीत प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी पाळण्यात विराजमान असलेल्या श्रीभगवंतांच्या उत्सवमूर्तीचे व त्याचबरोबर सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या प्रतिमेचेही पूजन केले. सौ.अमिताताई आगटे यांनी अत्यंत भावपूर्ण स्वरात ‘नंद मुकुंद मुरारी सावळा, गोकुळात हरि आला हो’ हे श्रीसंत माणिकप्रभू महाराजांचे पद सादर केले. त्यानंतर ‘जो जो जो जो रे बाळा’ हा श्रीसंत एकनाथ महाराज विरचित पाळणा गायिला. त्यानंतर सर्वांनी श्रीभगवंतांची आणि श्री माउलींची आरती म्हटली.
त्यानंतर प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांनी बाळकृष्णांच्या गोकुळातील आगमनानंतर नंदबाबांच्या घरी झालेल्या आनंदोत्सवाचे रसाळ वर्णन केले. तसेच मथुरेतील कंसाच्या कथेचा भागही सांगितला. त्यानंतर त्यांनी झालेली जन्मकाळ कथा-सेवा श्रीभगवंतांच्या चरणीं समर्पित केली. अत्यंत भावपूर्ण वातावरणात पहिल्या दिवशीचे कार्यक्रम समाप्त झाले. श्रीभगवंतांचे, श्री माउलींचे आणि उभय सद्गुरु श्रीस्वामी महाराजांचे दर्शन व तीर्थप्रसाद घेऊन सर्व साधकजन आपापल्या मुक्कामी परतले.
शनिवार दिनांक १६ ऑगस्ट, दुसऱ्या दिवशी सकाळी चहापान व नाष्टा झाल्यानंतर साधकजन नऊ वाजता मुख्य मंदिरातील सभागृहात आसनस्थ झाले. सुगंधी पुष्पांनी सजविलेली दहीहंडी सभागृहाच्या मध्यभागी बांधण्यात आली होती. उपस्थित सर्वजण काल्याच्या कीर्तन-सेवेचे अवीट रसपान करण्यास आतुर होते. राजदंड व भालदार-चोपदारांसह प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांचे धोतर-उपरणे, मोतिया रंगाचा रेशमी झब्बा, कपाळी बुक्का आणि मस्तकी फेटा अशा पारंपरिक वेषात सभागृहात आगमन झाले. सद्गुरूंच्या या रूपाचे दर्शन सर्व साधकांच्या हृदयीं ‘वेधियेलें मानस, हरपली दृष्टी’ अशीच अनुभूती घडविणारे होते.
सकाळी ठीक ९.३० वाजता ‘गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण ।’ या नामगजराने कीर्तन-सेवेस आरंभ झाला.
हा श्रीसंत तुकाराम महाराजांचा अभंग प.पू.सद्गुरु श्री.दादांनी सेवेस घेतला होता. भगवंतांच्या गोकुळातील विविध बाललीलांचे वर्णन करताना त्यासोबतच काल्याच्या लीलेचा गूढार्थ देखील प.पू.श्री.दादांनी या वेळी विशद केला. त्यांनी सांगितले की, ‘‘अनेक युगांच्या तपाचरणाने सिद्धत्व प्राप्त झालेले ऋषिगण श्रीभगवंतांच्या सगुण रूपाचा सर्वांगांनी आस्वाद घेता यावा म्हणून गोप-गोपींच्या रूपाने पुन्हा भूलोकी जन्म घेऊन आले. भगवंत हे सर्व कलांचे अधिष्ठाते असल्याने त्यांचे एक टक पाहणे, हसणे, रांगणे, बोलणे, धावणे, नृत्य इत्यादी सर्वच मनमोहक असते. भक्तांना आनंद देण्यासाठी ते अशा लीला करीत असतात !’’ प.पू.श्री.दादांनी यातील अनेक लीला वर्णन केल्या तेव्हा सर्व उपस्थित सज्जन मंत्रमुग्ध झाले होते.
प.पू.सद्गुरु श्री.दादांनी स्तेय (चोरी), वनातील खेळ व गो-चारण लीलाकथांचे वर्णन केले त्या वेळी श्रीभगवंतांनी सवंगड्यांसह खेळलेले खेळ साधकबंधूंनी उत्साहाने व कौशल्याने सादर केले. ‘हुतुतू’, ‘कांदाफोडी’, ‘कुस्ती’, ‘कान्होबाचा दरबार’, ‘खो खो’, ‘पिंगा’, ‘फुगडी’ असे विविध खेळ अभंगांच्या साथीने बघण्यात सर्व भक्तजन दंग झाले. यानंतर ‘राधेकृष्ण, गोपाळकृष्ण’चा गजर करीत सर्वांनी फेर धरला. बाल श्रीकृष्णांच्या रूपातील चि.शर्व याने दहीहंडी फोडली.
‘‘श्रीभगवंतांनी केलेला काला म्हणजेच प्रत्यक्ष ब्रह्मरस. देवादिकांनाही ज्याचा लाभ होत नाही तो काला या गोपांना मिळाला. सद्गुरुकृपेने प्राप्त झालेले साधन त्यांनी सांगितल्याप्रमाणे नित्य नेमाने व विश्वासाने केले असता साधक जीवासही ब्रह्मरसाचा लाभ होऊ शकतो !’’ असे सांगून प.पू.सद्गुरु श्री.दादांनी कीर्तन-सेवेची सांगता केली व झालेली सेवा श्रीभगवच्चरणीं समर्पित केली.
त्यानंतर आरती होऊन सर्वांनी देवदर्शन व काल्याचा प्रसाद घेतला. अमृतासमान अशा मिष्टान्नयुक्त महाप्रसादाच्या सेवनाने सर्व भक्तजन तृप्त झाले.
अगोदर गोपूजन होऊन सायंकाळी ठीक ६.३० वाजता श्रीभगवंतांची राजोपचार महापूजा सुरू झाली. प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी वेदमूर्ती श्री.दत्तात्रेयशास्त्री जोशी गुरुजी आणि ब्रह्मवृंदाच्या मार्गदर्शनाप्रमाणे श्रीभगवंतांची यथासांग षोडशोपचारे पूजा केली. प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या उपस्थितीत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शास्त्र, पुराण, पंचांग, नृत्य, गायन, चामर, वाद्य व नामजप सेवा यांनी युक्त अशी परिपूर्ण राजोपचार पूजा अनुभवण्याचे भाग्य उपस्थित साधकजनांना लाभले. या प्रसंगी कु.मैत्रेयी काळे यांनी नृत्य, श्री.राजाभाऊ शेंबेकर यांनी गायन, कु.शाल्मली भालेराव यांनी चामर, सर्व साधकबंधूंनी नामजप, तसेच श्री.विजय उपाध्ये, श्री.मनोज भांडवलकर, श्री.सुश्रुत चितळे, श्री.शैलेश सहस्रबुद्धे यांनी वादन-सेवा श्रीभगवंतांच्या चरणीं रुजू केल्या.
प्रत्येक साधकासाठी एक अद्वितीय आध्यात्मिक पर्वणी म्हणजे श्रीक्षेत्र आंबेरी ‘तपोवन’ येथील भगवान श्रीकृष्णजन्माष्टमीचा दोन दिवसांचा महोत्सव ! श्रीभगवंतांचे आणि श्रीसद्गुरूंचे दर्शन, प.पू.सद्गुरु श्री.दादांची प्रवचन-सेवा व कीर्तन-सेवा यांचा श्रवण-लाभ, राजोपचार-पूजन व दर्शन आणि ‘तपोवन’ परिसरात व्यतीत केलेला काळ हा खरेच सर्व साधकांसाठी महद्भाग्याचा व सद्गुरुकृपेचा अवर्णनीय प्रत्ययच आहे. या दिव्य-अनुभूतीने कृतार्थता अनुभवणारे सर्व साधकजन हृदयातील आनंदाचा मनोमन पुनः प्रत्यय घेत, श्रीसद्गुरूंच्या चरणीं वारंवार नमन करीत आपापल्या स्थानी परतले.
उत्सवातील काही क्षण चित्रे















