

|| श्री ||
राष्ट्रसाधक प्रशिक्षण शिबिर – डिसेंबर २०२४

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुटुंबातील राष्ट्रीय चारित्र्य संवर्धित करणारी संस्था – विवेक परिवार तसेच आपल्या श्री ज्ञानदेव सिद्धबेट तपोवन, ज्ञान-योग-अध्यात्म विद्यापीठ प्रतिष्ठान अंतर्गत श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रसाधक प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले. स्व-साधन, वैयक्तिक वाचन, सद्गुरुसेवा, आध्यात्मिक अभ्यास, उत्तम नीतिमूल्ये, आत्मोद्धार व नेतृत्वगुण विकास तसेच देव – धर्म – देश बळकट करण्याच्या दृष्टीने या वर्गांमध्ये तज्ज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केले.
संक्षिप्त चलतचित्र

श्री. शिरीष गाडगीळ यांनी राष्ट्रसाधक ही नेमकी काय संकल्पना आहे व या शिबिराचा काय उद्देश आहे याचा परिचय करून दिला. साधक व साधना हा श्रीपाद सेवा मंडळाचा गाभा आहे तर विवेक व्यासपीठाचे स्पार्क या माध्यमातून समाजकार्य सुरू आहे. या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्र आणि साधक या शब्दांचा विस्तृत अर्थ श्री.धनंजय चितळे यांनी वेद, दासबोध व अन्य ग्रंथांतील उदाहरणांसह स्पष्ट करून सांगितला. राष्ट्र कसे निर्माण होते तर ‘जिथे देशाची उन्नती सर्व लोकांच्या शिरावर आहे याची जाणीव प्रत्येकाला होईल तिथे राष्ट्र निर्माण होते.’ तसेच ‘बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध’ अशा मनुष्याच्या अवस्था असतात. यातल्या साधकाची भूमिका म्हणजे जो माणुसकीला धर्माचा गाभा मानतो तो साधक. चितळे सरांनी अशा विविध उदाहरणांनी राष्ट्राची आणि साधकाची भूमिका अभ्यासकांना स्पष्ट केली.
श्री.रोहन उपळेकर यांनी अध्यात्माची आवश्यकता, बहिर्मुखता व अंतर्मुखता हा विषय उलगडून दाखवला. त्यातही अंतर्मुख होणे म्हणजे काय ते स्पष्ट केले. जर आपण आतून शांत असू तरच बाहेरचे काम आपण शांतपणे आणि अधिक परिणामकारतेने करू शकतो. स्वार्थ सोडून परमार्थ बघणे म्हणजेच अंतर्मुख होणे.
मनुष्यदेह व त्याची सार्थकता सांगताना श्री.धनंजय चितळे म्हणाले की, आत्मभान ठेवत कष्ट करावेत, परोपकार करावा व संतांचे विचार सर्वदूर, सर्व लोकांपर्यंत पोहोचवावेत.
सद्गुण संपत्तीचा विकास हा प्रयत्नाधीन आहे. समोरच्यातील अवगुण न बघता सद्गुण शोधता आले पाहिजेत. चांगले गुण प्रयत्नपूर्वक आत्मसात केले पाहिजेत. त्यासाठी संतांची चरित्रे आवर्जून वाचावीत, असे रोहनजींनी सांगितले.
श्री.धनंजय चितळे यांनी भारतीय संस्कृती बद्दल बोलताना सांगितले की, आपली संस्कृती ही परिपूर्ण जीवनशैली आहे. सद्गुरुकृपेने अहंकाराला शून्यापर्यंत आणणारी आपली संस्कृती हे विश्वाचे वैभव आहे.
अत्यंत कठीण वाटणारा विषय ‘कर्मसिद्धान्त व विहितकर्म’ उलगडून सांगताना श्री.रोहन उपळेकर म्हणाले की, कुठलेही कर्म वाया जात नाही, तसेच कोणत्याही कर्माचा चांगला-वाईट भोग भोगण्यावाचून पर्याय नसतो. वाईट आणि चांगले कर्म करायला कष्टच लागतात तर वाईट कर्म करून दुष्परिणाम का भोगावेत? चांगलेच वागावे. कायम सकारात्मकच वागावे. शास्त्रांनी जे आवश्यक कर्म सांगितले आहे ते विहितकर्म. आपल्याच पूर्वकर्मांमुळे या जन्मात पुढे उभ्या ठाकलेल्या कर्माला शांतपणे सामोरे गेलात तर कर्म लवकर संपते. सद्गुरुकृपेने हे दोन्ही प्रयत्नपूर्वक साध्य होते. संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण हे कर्मांचे तीन प्रकार त्यांनी विविध उदाहरणांनी समजावून सांगितले.

‘अभ्यासे प्रकट व्हावे’ हे समजावताना श्री.धनंजय चितळे म्हणाले की जगात ‘पत’ मिळवायची असेल तर ‘तप’ करावे लागेल, नाहीतर ‘त त प प’ होते. जितके वेळा तुम्ही वाचाल, ऐकाल तितके वेळा तुम्हांला त्याचा अर्थ नव्याने कळत राहील. आणि नंतरच तो कळलेला अर्थ इतरांना समजावून सांगता येईल.
साधकांसाठी उपासना करणे आवश्यक आहे असे सांगताना श्री. रोहन उपळेकर म्हणाले की उपासना ही शुद्ध पुण्य देणारी असते. नामस्मरण हे उपासनेचे सर्वश्रेष्ठ व सर्वात सोपे साधन आहे. उपासनेचा आधार नसेल तर साधक सेवाकार्यही धडपणे करू शकणार नाही. दुसऱ्या दिवशीची सत्रे संपल्यानंतर सर्व शिबिरार्थींनी श्रीक्षेत्र आळंदीतील भगवान श्री माउलींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या विश्रांती वट, सिद्धबेट तसेच श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मठात दर्शन घेऊन स्थानमाहात्म्य जाणून घेतले.

राष्ट्रसाधकाचे व्यवस्थापन कसे असावे व त्याचबरोबर नेतृत्व कौशल्य कसे असावे हे सांगताना श्री. शिरीष गाडगीळ यांनी चार मुद्दे मांडले, ते म्हणजे शुद्ध विचार (Purity of thoughts), प्रामाणिक प्रयत्न(Honesty), नि:स्वार्थीपणा (Selflessness), आणि प्रेम(Love). उत्तम नेतृत्वासाठी आत्मभान, संघटनकौशल्य, वेळेचे नियोजन, आत्मपरीक्षण, वक्तृत्व व श्रवण आदी गुणांची आवश्यकता असते. त्याचबरोबर कामक्रोधादी षड्रिपूंचा नाश करता आला पाहिजे, किमान त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हे सांगितले. तसेच आपण नित्य एकांताची सवय लावून आपल्या आत डोकावून connection – correction and new direction व proper good direction ने स्वतःला सुधारावे मग समाज – गाव- मित्र परिवार – राज्य – राष्ट्र व समस्त जग नक्की सुधारेल हे सांगितले. आपण माणुसकीने सर्वांना मदत कशी करावी , आपणांस मदत केली तर कृतज्ञ असावे. तसेच कोणी आपल्या दुखावले तर माफी – Let Go – करावी व आपण कोणास दुखावू नये व दुखावल्यास क्षमा मागावी. तसेच संघटन , नेतृत्व , वक्तशीरपणा. गुप्तता व राष्ट्रीय चारित्र्य यांचे महत्त्व सोदाहरण विशद केले.
श्री.सुनील साठे यांनी सामाजिक कार्य याची संकल्पना कशी करावी, त्याची समाजात काय आणि का आवश्यकता आहे हे समजावून सांगितले. माणसे कुठल्याही समाजातील असतील, जातीतली असतील, धर्मातली असतील तरी ती माझी आहेत ही भावना जोपासून सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायचे हेच संस्कार महत्त्वाचे आहेत असे सांगितले.
श्री. सोहम बगे व श्री. नचिकेत कुलकर्णी यांनी एक गीत सादर केले.
या शिबिराचा समारोप श्री. दिलीपजी करंबेळकर यांच्या मार्गदर्शनानी झाला. त्यावेळी ते म्हणाले की आपल्या व्यक्तिगत जीवनाचा विकास करता करता समाजाचेही उदात्तीकरण करणे गरजेचे आहे. आपल्या प्राचीन व प्रगल्भ संस्कृतीची मूल्ये काही प्रमाणात तरी जतन करणे प्रत्येक राष्ट्रसाधकाचे कर्तव्य आहे. समाजाशी आपले काही नाते निर्माण झाले पाहिजे.
सर्व शिबिरार्थींना ‘विवेक’चे अध्यक्ष श्री.दिलीपजी करंबेळकर यांचे शुभहस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. शिबिराचा समारोप श्रीसंत ज्ञानेश्वर माउलींच्या पसायदानाने झाला.
दररोजच्या सत्रांनंतर शिबिरार्थी साधकांची मार्गदर्शकांसोबत अनौपचारिक चर्चा होत होती. चर्चांमुळे शिबिरात खेळीमेळीचे व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रासाधक एका कुटुंबाचे सदस्य असल्याची भावना बळावली. श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठाचे स्वयंसेवक अतिशय प्रेमाने व आपुलकीने राष्ट्रसाधक शिबिरार्थींची सर्व व्यवस्था पाहात होते. विवेक परिवारानेही शिबिराच्या नियोजनात मोलाची भूमिका बजावली. घरगुती, खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेले हे पहिले राष्ट्रसाधक शिबिर सर्वांना प्रेरणादायी ठरले!
शिबिरातील काही क्षण चित्रे












