
दि. २२ सप्टेंबर २०१९ रोजी पार पडलेल्या ज्योतिष विषयावरील श्री. श्रीराम पागे यांच्या व्याख्यानाचा संक्षिप्त गोषवारा वृत्तांत सदरात दिला आहे.
काळाचे ज्ञान करून देणारे साधन म्हणजे पंचांग ! काळाची अनुकूलता पाहून कार्य केले तर कार्यसिद्धी हमखास मिळते . आकाशातील तारे , ग्रह जे अखंड गतिमान असतात , त्यांच्या आकर्षणाचा , किरणाचा , तेजाचा प्रभाव आपल्यावर नकळत होत असतो . कृत किंवा सत्ययुग , त्रेतायुग , द्वापारयुग आणि कलियुग अशी चार युगे आहेत . आपल्या शास्त्रात जगाचा उत्पत्तीकर्ता ब्रह्मदेव मानला असून त्याच्या एका दिवसाला एक कल्प म्हणतात . त्या एका कल्पात 14 मनू होतात . मनू म्हणजे या पृथ्वीवरचा प्रथम पुरुष ! आतापर्यंत सहा मनू होऊन गेले आणि सध्या सातव्या वैवस्वत मनुचे राज्य सुरू आहे . चारही युगे संपली की एक महायुग होते . कलियुग ४३२००० वर्षांचे आहे. कलियुगाच्या दुप्पट द्वापार युग, तिप्पट केली की त्रेतायुग व चौपट केली की कृतयुगाचा काळ होतो.
संवत्सर म्हणजे वर्ब ! शालिवाहन शकात साठ संवत्सरे आहेत. त्यातली पहिली वीस वर्बे ब्रह्मदेवाची , दुसरी वीस वर्बे भगवान विष्णूंची, तिसरी वीस वर्बे शिवांची मानली गेली आहेत. याचाच दुसरा अर्थ क्रमाने उत्पत्ती , स्थिती, लय असा करतात. सध्या ‘शोभन’ नाम संवत्सर सुरू आहे आणि क्रमाने हे ३७वे आहे. शालिवाहन शक आणि इसवी सन यात ७८ वर्षांचा फरक आहे . नर्मदेच्या उत्तरेला विक्रम संवत व दक्षिणेला शालिवाहन शक मानतात.
आपल्या येथे आपण देशपांडे पंचांगच का वापरतो ? याचे कारण म्हणजे आपल्या सद्गुरूंनी विचारांती त्यालाच प्राधान्य दिले आहे ; कारण हे सूर्य सिद्धांत पद्धतीवर आधारित आहे . त्या पद्धतीचे सूत्र आहे वागवृध्दीरसक्षय. याचा अर्थ असा की ५ घटींनी तिथीची वृद्धी व ६ घटींनी क्षय असा आहे . म्हणजे तिथे जास्तीत जास्त ६५ घटिका व कमीत कमी ५४ घटिका होते. संपूर्ण वर्षात याचा मेळ बरोबर साधला जातो . हा सूर्यसिद्धांत अतिशय प्राचीन व संयुक्तिक असल्याने आपल्या सद्गुरूंनी ह्या पद्धतीला विचारांती प्राधान्य दिले आहे.
पंचांग म्हणजे ५ अंगे . ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, करण, योग होत. त्यांचा संक्षिप्त खुलासा असा,
- तिथी अमावस्येला सूर्य चंद्र एकत्र असतात. चंद्राची गती जास्त असल्याने तो सूर्याच्या पुढे १२ अंश गेला की एक तिथी होते. याप्रमाणे १५ व्या तिथीला पौर्णिमा व ३० व्या तिथीला अमावस्या येते.
- वार – वाराची सुरुवात रविवारपासून करतात.
- नक्षत्रे – एकूण 27 नक्षत्रे आहेत. नक्षत्र म्हणजे आपल्या स्थानापासून ढळत नाही ते नक्षत्र .
- योग- एकूण २७ योग आहेत . योग म्हणजे सूर्य व चंद्र यांच्या गतीची बेरीज. १३ अंश अधिक २० कला झाली की एक योग होतो. यातील ९ योग अशुभ म्हणून सांगितले गेलेले आहेत.
- करण – तिथीच्या अर्ध्या भागाला करण म्हणतात. एकूण ७ करणे आहेत. स्थिर व चर असे दोन प्रकारचे करण असतात. विष्टी करणारालाच भद्रा करण म्हणतात. चंद्र ६ अंश पुढे गेला की एक करण होते.
पंचांगात अनेक महत्त्वाच्या व मानवाच्या हिताच्या गोष्टी असतात त्या सर्वांचा संक्षिप्त आढावा घेऊ.
- अयने- अयन म्हणजे जाणे. सूर्य ६ महिने उत्तरेकडे व ६ महिने दक्षिणेकडे सरकलेला दिसतो. त्याला उत्तरायण – दक्षिणायन म्हणतात.
- ऋतू – वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे ऋतू असून त्या प्रत्येकाचा कालावधी दोन महिन्यांचा असतो.
- भारतीय महिने – चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन असे बारा महिने असतात.
- बारा राशी – मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन
- सौर वर्ष – सूर्य अश्विनी नक्षत्रापासून निघून पुन्हा तिथपर्यंत येण्याला सूर्याला 365 दिवस ५ तास व ४९ मिनिटे लागतात.
- चंद्र वर्ष – पौर्णिमेला चित्रा नक्षत्रात चंद्र असतो , तेव्हा चैत्र महिना. विशाखा नक्षत्रात असतो , त्यावेळेस वैशाख महिना ; याप्रमाणे असते .
- अधिक मास – सूर्य व चंद्राच्या गतीत जेव्हा ११ दिवस व ६ तासांचे अंतर पडते , तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी जो कालावधी लागतो ; त्याला अधिक मास म्हणतात . ज्या चांद्र मासात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही , तेव्हा अधिक मास येतो.
- पंचक – पाच प्रकारच्या दोषांना पंचक म्हणतात . रोग-अग्नी-राज-चोर-मृत्यू हे पाच दोष मानले आहेत. रोग पंचक हे लग्न व मौंजीला वर्ज्य . अग्निपंचक गृहप्रवेशाला , राजपंचक राजकार्याला , चोर पंचक प्रवासाला व अग्निपंचक गृहप्रवेशाला वर्ज्य मानले आहे.
- गुरुपुष्यामृत योग – ज्या वेळेस गुरु ग्रह आपल्या भ्रमणात कर्क राशीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा श्रेष्ठ असा हा योग होतो.
- साडेतीन मुहूर्त – १) चैत्र शुद्ध प्रतिपदा (२) दसरा (३)बलिप्रतिपदा व अक्षय तृतीया अर्धा मुहूर्त.
- तिथी-वार-नक्षत्र यांच्या योगाने काही योग पंचांगात दिलेले असतात. त्यात दग्धयोग, मृत्यूयोग, यमघंटयोग, अमृतसिद्धीयोग
- तिथीवासर – भागवत एकादशीचा उपवास द्वादशीच्या पहिल्या पादाला सोडणे.
- करीदिन – मकर संक्रांत (जानेवारी), कर्कसंक्रांत (जुलै), भाउका अमावस्या (वैशाख), होळी ग्रहण , यांच्या दुसऱ्या दिवसाला करीदिन म्हणतात.
- याच्याशिवाय पंचांगातील इतर माहितीमधे (१) तिथीवासर (२) करीदिन (३) गजच्छाया पर्व(४) अर्ध्योदय व महोदय पर्व (५) कपिलाषष्टी पर्व (६) वाहणी योग (७)पद्मक योग (८)प्रदोष (९)अमावस्या (१०)चतुर्थी (११)घबाड योग (१२)निशिद्ध काळ अशी अनेक प्रकारच्या व्रत, उपासना, कार्य सिद्धीसाठीची माहिती दिलेली असते.
- पर्जन्य विचारात पावसाची नऊ नक्षत्रे, त्यांचे वाहन तसेच पु. स्त्री. चं स् असे लिहिले असते. त्यावरून पावसाचा अंदाज करता येतो.
- ग्रहण विचार व त्याचे होणारे परिणाम
- शुभ-अशुभ मुहूर्त , वास्तु मुहूर्त , नवग्रह उपासना , जन्म मृत्यूची शुभ-अशुभ वेळ, विवाह गुण मिलन, अधिक मासाची माहिती वगैरे अनेक गोष्टींचा खजिना म्हणजे पंचांग आहे.