|| श्री ||

महाशिवरात्री महोत्सवाचा वृत्तांत

संक्षिप्त चलतचित्र

महोत्सव स्थळ

रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी साडेसात ते रात्री अकरा या वेळेत ‘माउली’ आश्रम, पुणे येथे प्रतिवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त भगवान श्री नर्मदेश्वरनाथ महाराजांना अभिषेक व महापूजा अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात प.पू. सद्‌गुरु श्री अनिरुद्ध दादा यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

प्रथम संकल्प होऊन तदनंतर श्रीगणेश पूजन झाले. पूर्वपूजेत श्री नर्मदेश्वरनाथ महाराजांना पंचामृत स्नान, फलरसस्नान व पुष्पोदक स्नान घालून जलाभिषेक करण्यात आला. अभिषेकाच्या वेळी रुद्रचमक, पुरुषसूक्त, श्री गणपती अथर्वशीर्ष यांचेही पठण करण्यात आले.

तसेच यावेळी चि. शर्व देशपांडे या साधकाने संपूर्ण ‘शिवमहिम्न स्तोत्रा’चे अस्खलित पठण केले. अभिषेकानंतर श्रीभगवंतांच्या अलंकार सेवेच्या वेळी भजनी चमूने ‘श्रीचंद्रशेखराष्टकम् स्तोत्र’, ‘श्रीलिंगाष्टकम् स्तोत्र’, ‘श्रीशिव मानसपूजा स्तोत्र’ तसेच अभंग गायन सेवा भगवद्चरणी रुजू केली.

यावेळी ‘साऱ्या पुण्याची पुण्याई’, ‘आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा’, ‘सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी’, ‘त्रिशुळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी’ असे काही सुंदर अभंग म्हणण्यात आले.

या प्रसंगी ‘शिव अष्टोत्तर शतनामावली’ने भगवान श्री नर्मदेश्वरनाथ महाराजांना बिल्वपत्रार्चन करण्यात आले व नैवेद्य अर्पण करून आरती करण्यात आली. मंत्रपुष्प झाल्यानंतर परंपरास्मरणाने या कार्यक्रमाची सांगता झाली. अनेक साधक-सद्भक्त या पर्वप्रसंगी उपस्थित होते.

श्रीसद्‌गुरु वंदन करून व तीर्थप्रसाद घेऊन कार्यक्रमास आलेले साधक-बंधू व भगिनी आपल्या गंतव्यस्थानी रवाना झाले. सद्‌गुरु कृपेने या महाशिवरात्रीच्या परम पावन पर्वकाळी सद्‌गुरुरूपी भगवान श्री नर्मदेश्वरनाथ महाराजांची सर्वांगसुंदर पूजा, स्तोत्रपठण, अलंकारपूजन, नामजप व अभंगगायन हे सर्व साधक-भक्तांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.

दर महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला श्रीक्षेत्र दत्तधाम येथील प.पू.सद्‌गुरु श्री मामा महाराजांच्या नामसमाधी मंदिरात स्थापन केलेल्या मरकत-मेरुपृष्ठ श्रीयंत्रावर महापूजा संपन्न होत असते. या वेळी रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्रीला, माघ कृष्ण चतुर्दशी म्हणून प्रदोषसमयी संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत श्रीयंत्राची श्रीसूक्त व देव्यथर्वशीर्ष यांच्या पठणासह अभिषेकपूर्वक महापूजा तसेच सोनचाफा, गुलाब, शेवंती, बिल्व, तुलसी आदी पुष्पांद्वारे अर्चना संपन्न झाली.

प्रतिवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त रात्री पावणेदहा वाजल्यापासून निशिथकालापर्यंत भगवान श्रीरामेश्वरनाथ महाराजांवर तसेच भगवान श्रीमन्नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीचरण पादुकांना पंचामृतयुक्त महापूजा संपन्न झाली. या पूजेच्या वेळी चिपळूण व कऱ्हाड येथील ब्रह्मवृंद उपस्थित होते. पूजेमध्ये आम्ररस, पंचामृत, दूध व शुद्ध जलाने लघुरुद्रपूर्वक अभिषेक संपन्न झाला. गणपती अथर्वशीर्ष, द्वे विरूपे सूक्त, श्रीसूक्त, पुरुषसूक्त आणि रुद्र अशी वैदिक सूक्ते म्हणून देवांना महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर बिल्वपत्र, सोनचाफा, निशिगंध आदी फुलांनी अष्टोत्तरशतनामपूर्वक पुष्पार्चना संपन्न झाली. त्यानंतर शिवपंचाक्षर मंत्राचा जप करत श्रीदत्तधाम येथील झाडांच्या रुद्राक्षांचे विशेष अर्चन करण्यात आले. चंद्रशेखराष्टक, दक्षिणामूर्ति स्तोत्र, शिवमानसपूजा आदी स्तोत्रांचे सामूहिक पठण व नामजप करण्यात आला. नंतर अभंगसेवा सादर करण्यात आली. तदनंतर आरती, मंत्रपुष्प आणि दीपोत्सव साजरा होऊन महापूजा संपन्न झाली. या दोन्ही महापूजांसाठी चिपळूण तसेच विहे, कऱ्हाड येथील काही साधक उपस्थित होते. अत्यंत प्रसन्न व मंगलमय वातावरणात हा महोत्सव संपन्न झाला. सर्व साधक-सद्भक्तांनी अपार शांती व आनंदाचा अनुभव घेतला.

उत्सवातील काही क्षण चित्रे

संस्थेत येण्यासाठी गुगल नकाशा

8

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.