|| श्री ||
“फल ज्योतिषशास्त्र” अभ्यास वर्ग
श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन संस्थेच्या, श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठाच्या वतीने दिनांक ९ व १० नोव्हेंबर, २०२४ रोजी, श्री. वरदविनायक खांबेटे यांचा ‘फलज्योतिष शास्त्र’ या विषयावर एक अभ्यासवर्ग आयोजित केला गेला. सदर कार्यक्रम आळंदीच्या, श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालयाच्या, भव्य वास्तूत, श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज सभागृहात संपन्न झाला.
अभ्यास वर्ग संक्षिप्त चलतचित्र
कार्यशाळेची सुरुवात दीप प्रज्वलनाने व दोन्ही दिवसांच्या सत्रांची सुरुवात श्लोक पठणाने झाली. पहिल्या दिवशी ज्योतिष हे कालगणनेचे साधन आहे, अशी ह्या प्राचीन शास्त्राची ओळख करुन दिल्यावर रवि, चंद्र वगळता, इतर ग्रह उघड्या डोळ्यांना जेमतेम दिसत असूनही सर्व भूतमात्रांवर मूलगामी परिणाम कसा काय करू शकतात ह्या मूलभूत प्रश्नाचे अत्यंत समर्पक असे उत्तर श्री. खांबेटे ह्यांनी दिले.
गवताच्या पात्यापासून ते मनुष्यप्राण्यापर्यंत, संपूर्ण प्रकृती, अर्वाचीन ताऱ्यांच्या धूलिकणांपासून बनली आहे असा स्तिमित करणारा विचार मांडून त्यांनी भारतीय अध्यात्मिक विचारधारेचा जणू पायाच अश्या कर्मसिद्धांताचा दाखला दिला. ज्योतिषशास्त्राच्या ‘केंद्रस्थानी’ असलेली कुंडली ही त्या जिवाच्या प्रारब्धकर्माचा आरसा असते व त्यातील ग्रह त्या जीवाला त्यानुसार फल प्राप्त करुन देतात असा मूलभूत विचार श्री. खांबेटे ह्यांनी मांडला. ग्रहांच्या माध्यमातून श्रीजनार्दनच ही फळे देत असतात असे प्रतिपादन त्यांनी संतवचनांच्या आधाराने केले.
पुढील सत्रात, ज्योतिषशास्त्रातील गणित, ते व्यवस्थित समजण्यासाठी ‘क्रांतिवृत्त’ ही आकाशातील एक काल्पनिक संरचना, तसेच हे गणित साधण्यासाठीचे अत्यंत उपयुक्त असे साधन, जे पंचांग, ते सहजपणे कसे पाहाता येते हे त्यांनी दाखविले.
दुसऱ्या दिवशीच्या सत्रांमध्ये, पंचांगाच्या आधारे, प्राथमिक गणिताच्या सहाय्याने, जन्मकाळाची कुंडली कशी तयार करावी ह्याचे शिक्षण दिले. ग्रह, राशी, नक्षत्रे ह्यांची त्या कुंडलीतील स्थाने कशी मांडावी हे त्यांनी दाखविले. ग्रहांच्या व राशींच्या कारकत्वाचे वर्णन सर्वच ग्रंथात सापडते मात्र त्याची कारणे कोठेच सापडत नाहीत असा दावा करुन, ह्याचे उत्तर सृष्टीच्या पंचमहाभूतात्मक रचनेत आहे असा एक अत्यंत नावीन्यपूर्ण व मौलिक विचार श्री. खांबेटे ह्यांनी मांडला.
दोन्ही दिवसांच्या शंका-समाधान सत्रांमध्ये, उपस्थितांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला, व त्या दरम्यान विचारलेल्या प्रश्नांची अत्यंत समर्पक उत्तरे देऊन श्री. खांबेटे ह्यांनी सर्वांचेच समाधान केले.
ज्योतिष या विषयी सर्वांनाच कमी जास्त प्रमाणात कुतुहल असते. परंतु त्याकडे काहीतरी गूढ, काहीवेळा थोतांड देखील, असा बघण्याचा दृष्टिकोन असतो. फलांची भाकिते जास्तीतजास्त खरी ठरण्यासाठी उत्तम ज्योतिषाचीच गरज असून त्यासाठी अनेक वर्षांचे तप आवश्यक असते असे श्री. खांबेटे ह्यांनी आवर्जून सांगितले. त्यांच्या या कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद मिळाला. जिज्ञासू आणि उत्सुक अभ्यासक ह्याकडे आता नक्कीच एक अभ्याससिद्ध शास्त्र या नजरेने बघतील.
सर्वच उपस्थितांना प्रकर्षाने जाणविलेला एक मुद्दा म्हणजे श्री. खांबेटे ह्यांच्या ठायी असलेला आपल्या पुरातन संस्कृति, ग्रंथ व ऋषि-मुनीं बद्दलचा जाज्वल्य अभिमान. खगोलशास्त्रातील बरेच आधुनिक सिद्धांत, आपल्या पुरातन वाङमयात ठिकठिकाणी कसे सापडतात ह्याचे अनेक दाखले त्यांनी ह्यावेळी दिले.
दोन्ही दिवसांच्या सर्वच सत्रांतील वेळा कटाक्षाने पाळल्या जातील ह्याची खात्री करुन श्री. समीर रुईकर यांनी या कार्यक्रमाचे हलकेफुलके पण अतिशय औचित्यपूर्ण असे सूत्रसंचालन केले. श्रीपाद सेवा मंडळाच्या सर्वच प्रकल्पस्थानी आढळणारी स्वच्छता, वेळेची शिस्त, सुनियोजन तसेच सर्वतोपरी सहाय्य करण्यास तत्पर असे नम्र स्वयंसेवक, ह्या सर्वांचीच दखल, उपस्थितांनी घेतली. कार्यशाळेच्या निमित्ताने लावलेल्या श्रीवामनराज प्रकाशनाच्या स्टॉलला साधकेतर अभ्यासकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.