॥ श्री ॥

श्रीक्षेत्र जळगांव (जामोद) येथे संपन्न झालेल्या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जयंती महोत्सवाचा वृत्तांत


भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जयंती महोत्सवाचा मुख्य सोहळा ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या श्रीक्षेत्र जळगांव (जामोद) या प्रकल्पस्थानी प.पू.सद्‌गुरु श्री.शिरीषदादांच्या आणि प.पू.सद्‌गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या परममंगल उपस्थितीत प्रतिवर्षी संपन्न होत असतो. या वर्षी हा उत्सव भाद्रपद शुद्ध ४ श्रीशके १९४७, मंगळवार व बुधवार दिनांक २६ व २७ ऑगस्ट २०२५ असे दोन दिवस प्रकल्पस्थानी आनंदमय व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. या महोत्सवासाठी पुणे, मुंबई, कऱ्हाड, नागपूर, भिलाई, कोल्हापूर, आंबेरी, अकोला, अमरावती, गोवा अशा मंडळाच्या विविध केंद्रांतून अनेक साधक-सज्जन आवर्जून उपस्थित होते.

महोत्सवाच्या आदल्या दिवशीपासूनच मंदिराचा संपूर्ण परिसर फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आला होता. सोमवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता प.पू.सद्‌गुरु श्री.दादांचे प्रकल्पस्थानी शुभागमन झाले. प्रकल्पस्थानी आल्यावर प्रथम प.पू.सद्‌गुरु श्री.दादांनी प्रेमभराने श्रीभगवंतांचे दर्शन घेतले. प.पू.सद्‌गुरु श्री.अनिरुद्धदादा यांचे सुद्धा याच रात्री साडेअकरा वाजता प्रकल्पस्थानी शुभागमन झाले.

संक्षिप्त चलतचित्र

उत्सवातील काही क्षण चित्रे

संस्थेत येण्यासाठी गुगल नकाशा

सद्‍गुरूंचा विश्वास निर्माण व्हावा, ह्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांनी सांगितलेले नीट ऐकून मनापासून करावे लागते; आणि शिवाय ते आपले म्हणून करावे लागते !

आपल्याला शुध्द सत्संग साधायचा आहे;
प्रत्येक क्षणाला तो मिळवायचा आहे.
"आपल्या आयुष्याचे पहिले ध्येय तेच असले पाहिजे; मग बाकीचे सगळे !"
असे जर निश्चयाने ठरवले, तरच ते साधेल.

श्रीसद्‍गुरुंचे आपल्याकडे सतत लक्ष असतेच;
आपलेच त्यांच्याकडे लक्ष नसते.
प्रसंगांनीच आपल्याला त्यांच्या वात्सल्यमय पांघरुणाची जाणीव होत असते.

सद्‍गुरूंवर, श्रीभगवंतांवर पूर्णत्वाने सगळे सोपवले पाहिजे,पूर्ण शरणागती पत्करली पाहिजे. मग भले कितीही वाईट प्रसंग आले तरी चालतील; कितीही चांगले प्रसंग आले तरी चालतील. आणि हे जर जमले; तरच त्या प्रेमाचा वसंतोत्सव अनुभवता येईल.

श्रीभगवंतांचे अनुसंधान, त्यांचे नामसंकीर्तन हे केवळ त्यांच्यासाठीच व्हायला हवे. त्यांच्याशिवाय त्यात इतर काहीही, एवढेसेही यायला नको. नाही तर आपले 'मी-माझे' सुटणारच नाही.

संसार हा एकाच गोष्टीसाठी चांगला; की संसार करता करताच सगळ्या परीक्षा होऊन जातात. मग परमार्थासाठी वेगळया परीक्षांना बसायची जरुरी नसते.

कुठल्या रूपाने श्रीभगवंत समोर येतील, माहित नाही! म्हणून समोर आलेल्या प्रत्येकाशी चांगलेच वागावे, नीटच वागावे. येणाऱ्याचे स्वागतच करावे; आपण अगदी त्याला ओळखत असलो तरी सुद्धा!

एखादी गोष्ट जर सोडायची असेल तर ते इतके सोपे नसते. आपण सोडू सोडू असे नुसते म्हणतो; मात्र ते सुटत नाही. पण जर कोणी दणका घातला तर मात्र ते लगेच सुटते. हा दणका कोण घालते? तर ते सद्‍गुरु घालतात; बरोबर योग्य वेळी घालतात. असा दणका मिळाला की, ती गोष्ट जागच्या जागी सुटते.

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!

हरिभजनाला, नामस्मरणाला उशीर करण्यात काही अर्थ नाही. जेवढा उशीर कराल, तेवढे आयुष्य हातातून निघून गेले असे समजायचे. म्हणून आपला एकही क्षण वाया जाणार नाही असा कसोशीने प्रयत्न तरी करायचा; म्हणजे निदान एक क्षण तरी मुखी नाम येईल.

आपल्या प्रत्येक कृतीमध्ये असे काही तरी
असावे की, जे श्रीभगवंतांना पोहचले पाहिजे.
.... आणि असे विचार येऊ लागले की समाजावे,
आपण अगदी योग्य दिशेला चाललो आहोत!

एक लक्षात ठेवा; कधीही, कितीही, कशीही कर्मे पुढे आली तरी ती नि:स्पृहपणे करायचा प्रयत्न करावा. शिवाय त्याच्यात दुसऱ्याला बुडवायचा चुकून सुद्धा विचार करू नये. जेवढा बुडवायचा विचार येईल, त्याच्या शंभर पटींनी भरावे लागेल हे लक्षात ठेवावे.

साधना जेव्हा मिळते तेव्हा; आपण जर लक्षात ठेवले असेल तर; असे आठवेल की, सद्‍गुरूंनी वेगळेच सांगितलेले असते आणि आपण मात्र ते ऐकूनही तिसरेच करत असतो.
शिवाय वर त्यांनाच विचारत असतो की; अहो आम्हांला अनुभव कसा नाही?

जितका साधनेचा निर्णय आपण पुढे ढकलू तितका आयुष्यातील वेळ वाया जात जाईल आणि आयुष्याच्या
शेवटी श्रीभगवंत काही भेटणार नाहीत. मग शेवटी त्यांचे नाम आठवणार नाही किंवा रूपही आठवणार नाही.

शांतपणे कर्मांचा उपभोग न घेणे
हे घातक ठरणारे असते.
पण तोच अलिप्तपणा जमला पाहिजे .

आपले कुठल्याही गोष्टींकडे दुर्लक्ष जरी झाले,तरी श्रीभगवंतच आपल्याला सांभाळून घेतात. ते आपल्याला कमीपणा येऊन देत नाहीत; कारण आपण त्यांचे नाम घेतोय ना? त्यांना तेच तर हवे असते. म्हणूनच कोठल्याही परिस्थितीत नामस्मरण सोडू नये.

Slider