परमपूज्य सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज व श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन प्रकल्प यांचा अल्प परिचय
परमपूज्य सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे श्रीदत्त संप्रदायातील एक थोर विभूतिमत्त्व होते. श्रीनाथ संप्रदाय, श्रीदत्त संप्रदाय व श्रीभागवत संप्रदाय यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच परमपूज्य श्री.मामा ! परमपूज्य श्री.मामांचे अवतारकार्य दि. २५ जून १९१४ (आषाढ शु.२) या दिवशी सुरू झाले.
प.पू.सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवी देशपांडे, सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउली व प.पू.सद्गुरु योगिराज श्री.वामनरावजी गुळवणी महाराज अशा ‘त्रिवेणी’ कृपेत प.पू.श्री.मामांचे अवतारकार्य पुण्यामध्ये सुरू झाले. प.पू.श्री.मामांना, प.पू.मातुःश्री पार्वतीदेवी आणि पू.श्री.दत्तोपंत देशपांडे या त्यांच्या पुण्यवंत आई-वडिलांकडून भगवद्भक्तीचे बाळकडू लहानपणीच मिळाले होते. आपल्या बालपणी साक्षात् राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या प.पू.सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवींकडून प.पू.श्री.मामांना शक्तिपात दीक्षा झाली व पुढे भगवान सद्गुरु श्री माउलींचे प्रत्यक्ष दर्शन होऊन श्रीनाथ संप्रदायाचा अनुग्रह झाला. त्या नंतर प.पू.योगिराज श्री.गुळवणी महाराजांकडून श्रीदत्त संप्रदायाची दीक्षा आणि परंपरा चालविण्याचे उत्तराधिकारही प्राप्त झाले.
प.पू.श्री.मामांनी लौकिक शिक्षण पूर्ण करून आसेतुहिमाचल (हिमालय, गंगोत्री, जम्नोत्री, काशी, हरिद्वार, ॠषिकेश, गिरनार, द्वारका, जगन्नाथपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, रामेश्वर, कन्याकुमारी) अनेकदा तीर्थयात्रा केल्या. संत सहवासात ते सदैव रमत असत. प.पू.श्री.मामा श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशी पायी वारी देखील दर वर्षी करीत असत.
श्रीज्ञानेश्वरीचे नित्य चिंतन करीत करीत प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी जगले व अनेकानेक साधकांना सोपे, प्रापंचिक दृष्टांत देऊन श्रीमाउलींना जे समाजाचे प्रबोधन अपेक्षित होते, ते प.पू.सद्गुरु श्री.मामांनी केले. शास्त्र, वेद, उपनिषदे यांचे पालन करून आचारधर्माचा एक आदर्श त्यांनी घालून दिला.
श्रीदत्त संप्रदायाची दीक्षा प.पू.सद्गुरु योगिराज श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांनी दिल्यावर “संप्रदाय तुम्हीच समर्थपणे चालवाल !” हा आशीर्वाद प.पू.श्री.मामांनी सार्थ करून दाखविला. पुण्यात ‘माउली’ आश्रमात अनेकविध अनुष्ठाने व अन्नदान केले. सुमारे २५ हजारांचा शिष्यसंप्रदाय जोडला. ‘श्रीपाद सेवा मंडळ’ धर्मादाय विश्वस्तनिधीची स्थापना करून जगभरात १०० पेक्षा अधिक केंद्रे स्थापन केली. ‘आत्मोद्धार’, ‘आत्मोन्नती’ व ‘साधन’ या उद्दिष्ट प्राप्तीसाठी साधकांना नामदीक्षा व शक्तिपात दीक्षा दिली.
प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी अनेक पीडितांना मार्गदर्शक करून प्रपंचातून परमार्थाकडे कसे जावे, याचे सहजयोग/साधना यांद्वारे मार्गदर्शन केले. श्रीदत्त संप्रदाय वृद्धिंगत करण्यासाठी आपले परंपरा व दीक्षा अधिकार प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे व प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांच्याकडे सुपूर्द केले.
‘श्रीवामनराज प्रकाशन’ व ‘श्रीवामनराज’ हे त्रैमासिक सुरू करून व श्रीदत्त संप्रदाय व श्रीज्ञानेश्वरीवर विपुल लेखन करून अनेक पुस्तके प्रसिध्द केली. ‘योग म्हणजे साधना’ व ‘बोध म्हणजे मार्गदर्शनपर प्रवचने व पुस्तके’ यांव्दारे हजारो साधकांचा एक विशाल परिवार श्री.मामांनी निर्माण केला.
इ.स. १९७४ ते १९९० या आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात प.पू.श्री.मामांनी पायाला भिंगरी लागल्यासारखा प्रवास केला. पुण्यात ‘माउली’ आश्रम, मुंबई, गोवा, भिलाई, कोल्हापूर, नागपूर, वर्धा, मोहोळ इत्यादी ठिकाणी उपासना केंद्रे तसेच कोयनानगरजवळ हेळवाक या सिद्धस्थानी भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे सुंदर मंदिर निर्माण केले. महाड येथे राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून सुंदर मंदिर निर्माण केले. तसेच जळगाव जामोद येथे भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या मंदिराची मुहूर्तमेढ रोवली. कोकणातील माणगावजवळ आंबेरी क्षेत्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे व भगवान श्रीकृष्ण मंदिर व ‘तपोवना’ची निर्मिती केली. साधकांना निसर्गरम्य, पवित्र वातावरणात साधन करता यावे, हाच यासर्व प्रकल्पांमागे उद्देश होता.
प.पू.सद्गुरु श्री.मामांनी समस्त साधकांना ‘सत् चित् आनंद’ मय अवस्था प्राप्त होण्यासाठी व निरामय साधनेसाठी श्रीक्षेत्र आळंदीत ‘सिद्धबेट’ स्थानी एक प्रकल्प निर्माण करावा असे ठरविले. श्रीज्ञानेश्वर माउलींचा जीवनकाल ज्या पवित्र भूमीत व्यतीत झाला होता, अशा सिद्धबेटी, सुंदर वृक्षवल्लींच्या व पशुपक्ष्यांच्या कूजनात साधक सद्भक्तांना कुटीत बसून भगवत् चिंतन व श्रीआदिशक्तीचे साधन करता यावे, असे एक सुंदर स्वप्न सत्यतेत आणण्यासाठी ‘श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन’ या ट्रस्टची स्थापना करून समाजातील सत्शील मंडळींना बरोबर घेऊन त्यांच्या सूचना व मार्गदर्शन घेऊन सिद्धबेटाची जागा त्यांनी सरकार दरबारी असंख्य चकरा मारुन मिळविली. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता, कधी चालत, तर कधी बस, रिक्षा, टॅक्सी, सायकल या मिळेल त्या वाहनांनी अहर्निश भ्रमंती करून पैसे जमा केले. मानहानी, अपमान, अवहेलना, शिव्याशाप हे तर एव्हाना सवयीचे झाले होते. पण उद्दिष्ट उत्तम होते, ‘साधकांना आत्मोद्धार साध्य करण्यासाठी उत्तम तपोवन व अभ्याससुविधा निर्माण करणे’ आणि त्यासाठी परमपूज्य श्री.मामांनी असंख्य खस्ता खाल्ल्या. फाल्गुन कृ. ९, दि.२१ मार्च १९९० रोजी पहाटे परमपूज्य श्री.मामांचे वैकुंठगमन झाले. पण परंपरेचे अधिकारी असलेल्या प.पू.सौ.ताई व प.पू.श्री.दादा या समर्थ शिष्यांनी ही पताका पुढे फडकत ठेवली व हे कार्य सुरूच ठेवले.