

‘प.पू.सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय ‘श्रीसंत निवृत्तिनाथ महाग्रज ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय’ या ग्रंथालयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यशाळेचा वृत्तांत.


‘प.पू.सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय, पुणे’ आणि ‘श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय, आळंदी’ या दोन्ही ग्रंथालयांच्या संयुक्त विद्यमाने, आळंदी येथील ‘श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय व सार्वजनिक वाचनलया’च्या इमारतीमध्ये दोन्ही ग्रंथालयात सेवेसाठी येणाऱ्या साधक बंधू भगिनींसाठी शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत, चिपळूणचे श्री. धनंजय चितळे यांच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आळंदी ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. जयंत साठे यांच्या हस्ते श्री. धनंजय चितळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
‘भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. (शियाली रामामृत) रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त १२ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. परंतु जास्तीत जास्त साधक बंधु भगिनींना या कार्यशाळेचा लाभ घेता यावा या करिता १० ऑगस्ट रोजी हा ग्रंथपाल दिन साजरा करण्यात येत आहे’ असे सौ. ज्योत्स्ना घाटपांडे यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये नमूद केले.
श्री. धनंजय चितळे यांनी श्री. रंगनाथन यांचा जन्म, त्यांचे शिक्षण, नोकरी, लंडनमधील ग्रंथालय शास्त्राचं शिक्षण, ग्रंथपाल आणि त्यांचे ग्रंथालय चळवळीतील योगदान असा त्यांचा जीवन प्रवास कथन केला.
श्री. चितळे यांनी ग्रंथ, वाचक व ग्रंथपाल या तिघांचं एकत्रिकरण म्हणजे ग्रंथालय असे सांगून ग्रंथसेवक कार्यतत्पर, अभ्यासू व कर्तव्यतत्पर असावा असे सांगितले. ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत, वाचकांपर्यंत ग्रंथ पोहोचले पाहिजेत, प्रत्येक पुस्तक हे वाचकांसाठी असते, वाचकांचा आणि ग्रंथपालाचा वेळ वाचला पाहिजे आणि ग्रंथालय ही वर्धिष्णु संस्था आहे ही ग्रंथालयशास्त्राची डॉ. रंगनाथन यांनी दिलेली ५ सूत्रे विस्ताराने सांगताना ग्रंथांची निवड कशी करावी, ग्रंथपालाची, ग्रंथसेवकाची जबाबदारी, त्यांचा दृष्टीकोन, ग्रंथांची देवघेव करताना कोणती काळजी घ्यावी, ग्रंथांची नोंदणी आणि त्यांचे वर्गीकरण नेमके कसे करावे, दुर्मिळ ग्रंथ व संदर्भ ग्रंथांचे नेमकं काय महत्व आहे यांसारख्या महत्वाच्या विषयांवर मोलाचं मार्गदर्शन अगदी हसत खेळत आणि अनेक गमतीदार उदाहरणं देऊन केलं. उपस्थितांच्या अनेक प्रश्नांना श्री. चितळे यांनी अतिशय समाधानकारक उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ज्योत्स्ना घाटपांडे यांनी केले. ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. जयंत साठे यांच्या हस्ते श्री. धनंजय चितळे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
कार्यक्रमातील काही क्षण चित्रे








