साधारणपणे डिसेंबर, २०१९ च्या सुमारास परमपूज्य सद्‌गुरू श्री मामासाहेब देशपांडे व परमपूज्य सद्‌गुरू मातोश्री सौ शकुंतलाताई आगटे यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने तसेच परमपूज्य सद्‌गुरू तीर्थरूप श्री शिरीष दादा कवडे आणि परमपूज्य सद्‌गुरू श्री अनिरुद्ध दादा आगटे यांच्या संकल्पनेनुसार व मार्गदर्शनाने ई-लायब्ररी या प्रकल्पाला सुरुवात झाली. प्रामुख्याने सनातन वैदिक धर्मातील दुर्मिळ हस्तलिखिते व ग्रंथ व हे उत्तरोत्तर कागदांवर टिकेल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच सध्याचा संगणकीय सुविधांचा व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून समस्त समाजाचा फायदा होत असेल, तर उत्तम असा विचार या प्रकल्पामागे होता.

दुर्मिळ हस्तलिखिते व पुस्तके मिळवणे, त्यांची योग्य ती सफाई करणे, निगा राखणे आणि आपण अंगीकार केलेल्या प्रक्रियेप्रमाणे (standard procedures and operating instructions) संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज ग्रंथालय, आळंदी आणि परमपूज्य श्री. मामासाहेब देशपांडे ग्रंथालय, पुणे या ठिकाणी ही पुस्तके आणणे, नोंद करणे, नीट ठेवणे ही यातील पहिली पायरी! त्यानंतर यातील महत्त्वाची संदर्भ-पुस्तके यादी करून, संशोधन करणाऱ्या समूहाकडे ती सुपूर्त करणे, ही दुसरी पायरी. संशोधन करणारा स्वयंसेवकांचा हा संघ ही पुस्तके मायाजालावर उपलब्ध असतील तर ती आपणांस scan करावी लागत नाहीत.अन्यथा त्या पुस्तकांचे संगणकीकरण (scanning) करणे आवश्यक आहे, हे ठरवतात. तदनंतर स्कॅनिंग करणारा स्वयंसेवकांचा संघ ही पुस्तके प्रामुख्याने आळंदीत स्कॅनिंग करतो. त्यानंतरचा संघ स्कॅनिंग झालेली पुस्तके अत्याधुनिक अशा मशीन लर्निंग या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने त्याची गुणवत्ता चांगली आहे ना, हे तपासतो. त्यानंतर स्कॅन केलेल्या प्रत्येक पुस्तकाचे प्रत्येक पान हे मूळ पुस्तकाबरहुकूम झाले आहे किंवा नाही , हे तपासले जाते आणि त्यानंतर सर्व गुणवत्ता व पुस्तकाची वाचनीयता ( legibility ) तपासून सदर पुस्तक किंवा हस्तलिखित हे पोर्टल वर ठेवण्यात येते.



सध्या आपण आळंदीतील संत श्री निवृत्तीनाथ महाराज ग्रंथालयात बसून ही स्कॅनिंग पूर्ण झालेली साधारण १२०० पुस्तके अवश्य अभ्यासू शकता. कॉपीराईट नियम व भारतातील कायदे तपासून लवकरच ही पुस्तके इंटरनेट मायाजालावर आपले जगभरातील साधक बंधू व भगिनी सिडनी पासून न्यूयॅार्कपर्यंत कुठेही असले , तरी लॉग इन करून या पुस्तकांचा सहज अभ्यास करू शकतात. आपणही पुण्यात येऊन सध्या इंट्रानेट द्वारे उपलब्ध असलेली ही पुस्तके आळंदीत येऊन अवश्य अभ्यासू शकता. त्याचप्रमाणे जगभरातील कोणत्याही ठिकाणची अमूल्य अशी हस्तलिखिते व पुस्तके आपणास देणगी म्हणून मिळत असतील वा नाममात्र किमतीत उपलब्ध होत असतील , तर श्री ज्ञानदेव सिद्धबेट तपोवनच्या विश्वस्तांना आपण जरूर कळवू शकता.

परमपूज्य सद्‌गुरू कृपेने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा जगन्नाथाचा रथ आपण ओढणार आहोत. परमपूज्य सद्‌गुरू श्री दादा यांनी जगभरातील सर्व ई लायब्ररी या आपल्या ई लायब्ररी मधून आपण बघू शकू किंवा त्यातील पुस्तकांचा अभ्यास करू शकू , इथपर्यंतचे उदात्त उद्दिष्ट आपल्या प्रकल्पातील काम करणाऱ्या स्वयंसेवकांना दिले आहे.

संस्थेत येण्यासाठी गुगल नकाशा

सद्‍गुरूंचा विश्वास निर्माण व्हावा, ह्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांनी सांगितलेले नीट ऐकून मनापासून करावे लागते; आणि शिवाय ते आपले म्हणून करावे लागते !

आपल्याला शुध्द सत्संग साधायचा आहे;
प्रत्येक क्षणाला तो मिळवायचा आहे.
"आपल्या आयुष्याचे पहिले ध्येय तेच असले पाहिजे; मग बाकीचे सगळे !"
असे जर निश्चयाने ठरवले, तरच ते साधेल.

श्रीसद्‍गुरुंचे आपल्याकडे सतत लक्ष असतेच;
आपलेच त्यांच्याकडे लक्ष नसते.
प्रसंगांनीच आपल्याला त्यांच्या वात्सल्यमय पांघरुणाची जाणीव होत असते.

सद्‍गुरूंवर, श्रीभगवंतांवर पूर्णत्वाने सगळे सोपवले पाहिजे,पूर्ण शरणागती पत्करली पाहिजे. मग भले कितीही वाईट प्रसंग आले तरी चालतील; कितीही चांगले प्रसंग आले तरी चालतील. आणि हे जर जमले; तरच त्या प्रेमाचा वसंतोत्सव अनुभवता येईल.

श्रीभगवंतांचे अनुसंधान, त्यांचे नामसंकीर्तन हे केवळ त्यांच्यासाठीच व्हायला हवे. त्यांच्याशिवाय त्यात इतर काहीही, एवढेसेही यायला नको. नाही तर आपले 'मी-माझे' सुटणारच नाही.

संसार हा एकाच गोष्टीसाठी चांगला; की संसार करता करताच सगळ्या परीक्षा होऊन जातात. मग परमार्थासाठी वेगळया परीक्षांना बसायची जरुरी नसते.

कुठल्या रूपाने श्रीभगवंत समोर येतील, माहित नाही! म्हणून समोर आलेल्या प्रत्येकाशी चांगलेच वागावे, नीटच वागावे. येणाऱ्याचे स्वागतच करावे; आपण अगदी त्याला ओळखत असलो तरी सुद्धा!

एखादी गोष्ट जर सोडायची असेल तर ते इतके सोपे नसते. आपण सोडू सोडू असे नुसते म्हणतो; मात्र ते सुटत नाही. पण जर कोणी दणका घातला तर मात्र ते लगेच सुटते. हा दणका कोण घालते? तर ते सद्‍गुरु घालतात; बरोबर योग्य वेळी घालतात. असा दणका मिळाला की, ती गोष्ट जागच्या जागी सुटते.

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!

हरिभजनाला, नामस्मरणाला उशीर करण्यात काही अर्थ नाही. जेवढा उशीर कराल, तेवढे आयुष्य हातातून निघून गेले असे समजायचे. म्हणून आपला एकही क्षण वाया जाणार नाही असा कसोशीने प्रयत्न तरी करायचा; म्हणजे निदान एक क्षण तरी मुखी नाम येईल.

आपल्या प्रत्येक कृतीमध्ये असे काही तरी
असावे की, जे श्रीभगवंतांना पोहचले पाहिजे.
.... आणि असे विचार येऊ लागले की समाजावे,
आपण अगदी योग्य दिशेला चाललो आहोत!

एक लक्षात ठेवा; कधीही, कितीही, कशीही कर्मे पुढे आली तरी ती नि:स्पृहपणे करायचा प्रयत्न करावा. शिवाय त्याच्यात दुसऱ्याला बुडवायचा चुकून सुद्धा विचार करू नये. जेवढा बुडवायचा विचार येईल, त्याच्या शंभर पटींनी भरावे लागेल हे लक्षात ठेवावे.

साधना जेव्हा मिळते तेव्हा; आपण जर लक्षात ठेवले असेल तर; असे आठवेल की, सद्‍गुरूंनी वेगळेच सांगितलेले असते आणि आपण मात्र ते ऐकूनही तिसरेच करत असतो.
शिवाय वर त्यांनाच विचारत असतो की; अहो आम्हांला अनुभव कसा नाही?

जितका साधनेचा निर्णय आपण पुढे ढकलू तितका आयुष्यातील वेळ वाया जात जाईल आणि आयुष्याच्या
शेवटी श्रीभगवंत काही भेटणार नाहीत. मग शेवटी त्यांचे नाम आठवणार नाही किंवा रूपही आठवणार नाही.

शांतपणे कर्मांचा उपभोग न घेणे
हे घातक ठरणारे असते.
पण तोच अलिप्तपणा जमला पाहिजे .

आपले कुठल्याही गोष्टींकडे दुर्लक्ष जरी झाले,तरी श्रीभगवंतच आपल्याला सांभाळून घेतात. ते आपल्याला कमीपणा येऊन देत नाहीत; कारण आपण त्यांचे नाम घेतोय ना? त्यांना तेच तर हवे असते. म्हणूनच कोठल्याही परिस्थितीत नामस्मरण सोडू नये.

Slider