
॥ श्री ॥
श्रीक्षेत्र दत्तधाम येथे संपन्न झालेल्या भगवान श्रीदत्तात्रेय जयंती महोत्सवाचा वृत्तांत
श्रीक्षेत्र दत्तधाम, हेळवाक येथे मार्गशीर्ष शु.१४, गुरुवार दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी भगवान श्रीदत्तात्रेयप्रभू जयंतीचा महोत्सव भक्तिभावपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखाने साजरा करण्यात आला.
संक्षिप्त चलतचित्र
भगवान श्रीदत्तात्रेय जयंतीच्या पावन पर्वानिमित्त सकाळी ८ वाजल्यापासूनच मंदिरपरिसर साधक, भाविक व दर्शनार्थ आलेल्या भक्तजनांच्या गर्दीने गजबजला होता. पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत संपूर्ण परिसर अत्यंत स्वच्छ करून महोत्सवानिमित्त ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच पुष्पसजावटही करण्यात आली होती. पायथ्याजवळील श्री रामदूत हनुमंतांचे मंदिर, श्रीवरदविनायक मंदिर, श्रीसद्गुरुपादुका मंदिर, नामसमाधी मंदिर व मुख्य मंदिर येथेही सुगंधी पुष्पमालांनी सजावट करण्यात आली होती तसेच मुख्य मंदिराला रोषणाई करण्यात आली होती. प्रवेशद्वाराजवळ ‘श्रीवामनराज प्रकाशन’ आणि ‘अमृतबोध’ मासिकाचा स्टॉल लावण्यात आला होता. त्याचाही भाविकांनी लाभ घेतला.
दुपारी ३ वाजल्यापासून पालखी-सोहळ्यासाठी आलेल्या साधकांनी देवदर्शन घेऊन आसनस्थ होण्यास सुरुवात केली. मुख्य मंदिराच्या बाहेर तीन बाजूंना बैठकव्यवस्था करण्यात आली होती. पुढील एका तासाभरात संपूर्ण मंदिर प्रांगण सद्भक्तांच्या गर्दीने भरून गेले. बाहेर असणाऱ्या भाविकांसाठी मोठा स्क्रीन लावून तेथे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.
प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा व प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांचे मंगल आगमन झाल्यानंतर, सायंकाळी ५.२० वाजता सुरुवातीला ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, ‘श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।’ व ‘जय जय करुणामूर्ति दयाळा’ या महामंत्रांचा काही काळ जप करण्यात आला व तदनंतर ‘श्रीदत्तभावांजली’ स्तोत्रपठणाने श्रीदत्त जयंती महोत्सवास आरंभ झाला. त्यानंतर पुरुषसूक्त पठण होऊन, ‘श्रीगुरुचरित्रा’तील चौथ्या; भगवान श्रीदत्तप्रभूंच्या जन्माध्यायाचे वाचन करण्यात आले. ठीक सूर्यास्तासमयी शंख, घंटा, तुतारी, टाळ, मृदंग, संवादिनी, झांजा अशा अनेक वाद्यांच्या गजरात अतिशय प्रसन्न, मंगल वातावरणात भगवान श्रीदत्तप्रभूंचा जन्मकाळ साजरा करण्यात आला व आरती होऊन मंत्रपुष्पांजली म्हणण्यात आली.
त्यानंतर सर्वच जण ज्याची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होते त्या भगवान श्रीदत्तप्रभूंच्या पालखी-सोहळ्यास सुरुवात झाली. प्रारंभी ‘जय जय राम कृष्ण हरी’चा गजर झाला आणि प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांनी स्वतः गायिलेल्या ‘रूप पाहतां लोचनीं’ या अभंगसेवेनंतर, पालखी-सोहळ्यास सुरुवात झाली. राजदंड, सूर्य-चंद्र चिन्हांकित अब्दागिऱ्या, चवऱ्या, मोरचेल घेणारे साधकबंधू, मशालजी, तुतारीवादक, पारंपरिक पोशाखातील चोपदार, शुभ्र वस्त्र परिधान केलेले टाळकरी, या साऱ्यांसह पुष्पमालांनी सजविलेली पालखी सोहळ्यासाठी सज्ज होती. देवांना औक्षण करून झाल्यानंतर प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी या सुशोभित अशा देखण्या पालखीमध्ये परंपरेची प्रतिमा व देवांच्या पादुका स्थापित केल्या.
त्यानंतर टाळकऱ्यांसोबत स्वतः प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा, त्यांच्या मागे सालंकृत शुभ्रवर्णी अश्व, मग पालखी आणि त्यांच्याबरोबर पालखीचे सेवेकरी स्वयंसेवक असे सर्वजण मंदिराच्या पूर्वद्वारापाशी आले. परंपरेच्या जयघोषाने सारा आसमंत अक्षरशः दुमदुमून गेला. ‘धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची’ या अभंगाने प्रदक्षिणेस सुरुवात झाली. सांप्रदायिक पालखी पदक्रम पद्धतीने अभंग, पदे, अष्टक, करुणात्रिपदी इत्यादी गाऊन श्रीभगवंतांचे नामसंकीर्तन करीत पालखीच्या तीन प्रदक्षिणा होऊन सोहळा संपन्न झाला. त्या वेळी प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांनी व त्यांच्या साथीदारांनी केलेली पावली बघताना सर्वांनाच अपार आनंदाचा अनुभव येत होता. पालखीच्या मार्गावर सुगंधाची लयलूट होत होती. संपूर्ण वातावरण अतिशय दिदव्य-मंगल आनंदाने भरून गेले होते.
‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ व ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामजपांचा गजर केला गेला. प्रत्येक थांब्यावर ‘दत्ता ब्रह्मचारी’, ‘देव देखिला औदुंबरी’, ‘नामसंकीर्तन साधन पै सोपें’, ‘सावळा सद्गुरु तारू मोठा रे’, ‘त्रैलोक्याचा राजा नरहरी तो माझा’, ‘कान्होबा निवडी आपुली गोधने’ इत्यादी अभंग; तसेच प.पू.श्री.शिरीषदादांनी रचलेले ‘आम्ही भाग्याचे भाग्याचे’, ‘श्रीपाद श्रीवल्लभ सद्गुरु विराजती यतिवर’ हे अभंग आणि ‘करुणात्रिपदी’चे गायन करण्यात आले. ‘हेचि दान देगा देवा’ हा अभंग म्हणून आणि परंपरास्मरण करून उपस्थितांना स्थळकाळाचा विसर पाडणारा हा मनोहर असा पालखी-सोहळा संपन्न झाला.
त्यानंतर भाविकांनी अतिशय शिस्तबद्ध रीतीने शांतपणे, भक्तिभावाने देवांचे दर्शन घेतले. ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या नाशिक येथील काही साधक बंधुभगिनींनी सर्व उपस्थितांकरिता सेवाभावाने उपवासाच्या फराळाची व्यवस्था केली होती. तीर्थ-प्रसाद व फराळ घेऊन; श्रीदत्तजन्म सोहळ्याचा आनंद हृदयात साठवून सर्वजण तृप्त अंतःकरणाने आपापल्या मुक्कामी परतले.
उत्सवातील काही क्षण चित्रे
