77000
एकूण पुस्तके
9000
संदर्भ ग्रंथ
68000
इतर पुस्तके
श्री माउलींच्या कृपाप्रेरणेने प.पू.श्री.मामांनी स्थापन केलेल्या ‘श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन ज्ञान-योग-अध्यात्म विद्यापीठ प्रतिष्ठान’ या संस्थेच्या वतीने आळंदीच्या वैभवात मोठी भर घालणारा एक प्रकल्प येथे आकारास आला आहे. ‘श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय’ हाच तो भव्य प्रकल्प. महाराष्ट्रातील समृद्ध ग्रंथालयांच्या परंपरेतील एक उत्तम ग्रंथालय म्हणजेच श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय.
बऱ्याच वेळा पुस्तक देवघेव केंद्र इतकीच ग्रंथालयाची ओळख असते. श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय मात्र याला अपवाद आहे. हे नुसते ग्रंथालय नसून एक संपन्न अभ्यासकेंद्रही आहे. दुर्मिळ व प्राचीन ग्रंथांचे जतन करण्याचे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालयाने अडीच लाख ग्रंथसंख्येचे उद्दिष्ट ठेवलेले असून लवकरच ते पूर्णत्वाला जाईल.
ग्रंथ अभ्यासण्यासाठी येणाऱ्या सन्माननीय अभ्यासकांसाठी या वास्तूच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर विश्रामिका आहेत. या ग्रंथालयाचे वैशिष्ट्य असणाऱ्या अत्यंत दुर्मिळ अशा संदर्भग्रंथांचा तसेच हस्तलिखितांचा प्रचंड मोठा संग्रह पहिल्या मजल्यावर निगुतीने सांभाळलेला आहे. श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालयाच्या वतीने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारत आहे. दुर्मिळ व महत्त्वाच्या स्कॅनिंग करून ते सर्व ग्रथं अभ्यासकांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी उत्तमोत्तम दर्जाचे स्कॅनर, प्रिंटर घेतलेले असून, अनेक ग्रंथांचे डिजिटायझेशन पूर्ण झालेले आहे व अजून ही चालू आहे.
या ग्रंथालयासही अनेक मान्यवर अभ्यासकांचे ग्रंथसंग्रह प्राप्त झालेलेआहेत. त्यामध्ये सरदार आबासाहेब मुजुमदार, वामन गणेश खाजगीवाले, डॉ.अहिरराव तसेच संस्कृतचे अभ्यासक श्री.आपटे यांच्या ग्रंथ संग्रहांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मराठी मॅन्युस्क्रिप्ट सेंटरने सुमारे अकराशे हस्तलिखित ग्रंथ/पोथ्या मोठ्या विश्वासाने या संस्थेला दिल्या आहेत. हे सर्व ग्रंथवैभव अभ्यासकांसाठी अनमोल खजिनाच आहे. उत्तमोत्तम ग्रंथांची दिवसागणिक त्यात वाढ होत आहे.
ग्रंथांवर मनस्वी प्रेम करण्याऱ्या प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली हे ग्रंथालय उत्तम वाटचाल करीत आहे. नवनवीन उपक्रमांसह वाचकांना, अभ्यासकांना ज्ञानसमृद्ध करण्याचा सेवावसा घेऊन सतत कार्यरत आहे. ज्या भूमीवर सद्गुरू श्री माउलींनी ज्ञानदानाचे कार्य संपन्न केले, तेथेच हे समृद्ध ग्रंथालय साकारले जावे; आणि तेही सद्गुरू श्री माउलींच्या प्राणप्रिय श्रीसद्गुरुंच्या, श्रीसंत निवृत्तिनाथ महाराजांच्या नावाने; ही तर करुणाब्रह्म सद्गुरु भगवान श्री माउलींची विशेष करुणाकृपाच आहे.
स्थापनेनंतर काही वर्षातच ग्रंथालयाला महाराष्ट्र शासनाची ’ब’ वर्गाची मान्यता मिळाली, आणि वाचक सभासदांची संख्या, तसेच नोंदणीकृत ग्रंथ संख्या सतत वाढत आहे. निवडक कथा कादंबऱ्या, विविध भाषांतील वाङ्गमय चोखंदळपणे खरेदी करण्यासाठी ग्रंथालय नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. तसेच, इतर संस्था व पुस्तकप्रेमींकडून ग्रंथदेणग्या पण लाभल्या आहेत. त्यामुळेच शेकडो विषयांवरील हजारो पुस्तके ग्रंथालयात आहेत. त्याचबरोबर संतसाहित्यविषयक व श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, श्रीसंत नामदेव, श्रीसंत तुकाराम, श्रीसंत एकनाथ महाराज, या संतांचे तसेच रमणमहर्षि, जे. कृष्णमूर्ति, प्रज्ञाचक्षू श्रीगुलाबराव महाराज, श्रीगोंदवलेकर महाराज, योगी असविंद, श्रीगुरूदेव रानडे, श्रीपंत महाराज (बाळेकुंद्री) इत्यादी विविध संतांचे सर्व वाङ्गमय उपासकांना, वाचकांना अभ्यासासाठी ग्रंथालयात उपलब्ध आहे. गीता प्रेस-गोरखपूरचे समग्र वाङ्गमय, रामकृष्ण मठ प्रकाशित वाङ्गमय, कल्पतरू रिसर्च अँकँडमीचे वाङ्गमय, श्रीवामनराज प्रकाशनाचे सर्व ग्रंथ असे संच सुद्धा उपलब्ध आहेत.
ग्रंथालयाच्या सेवा आणि खास वैशिष्ट्ये
- ग्रंथालय स्वतंत्र असून वृत्तपत्रवाचनासाठी येणाऱ्यांना स्वतंत्र वाचनकक्ष व बैठकव्यवस्था आहे. मोफत वृत्तपत्रे वाचनास सर्वांना उपलब्ध आहेत.
- बाल वाचक , युवक-युवतींसाठी व प्रौढ वाचकांसाठी भिन्न विभाग आहेत, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कथा-कादंबऱ्या, अभ्यास ग्रंथ, ललित साहित्याबरोबरच संपूर्ण चातुर्मास, व्रतवैकल्पे, तिर्थयात्रा, क्षेत्रमाहात्म्य, पुराणे, संतवाङ्गमय असे धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथही उपलब्ध आहेत.
- दूरध्वनीव्दारे सुध्दा पुस्तक परतीची मुदत वाढविता येते. दूरवर, परगावी राहणाऱ्या वाचकांच्या सोईसाठी आवर्जून ही सवलत दिलेली आहे.
- समृध्द संदर्भ विभागातील ग्रंथांचा, संस्कृत, मराठी, हिंदी वाङ्गमय अभ्यासक, वाचक नियमित लाभ घेत असतात. अभ्यासकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था संदर्भ विभागातच असल्यामुळे त्यांची फार मोठी सोय झालेली आहे.
ग्रंथालयाच्या वेळा
सकाळी – १०.३० ते सायंकाळी – ६.००
साप्ताहिक सुट्टी – सोमवार