श्रीसंत परंपरेचे अनेक आशीर्वाद, परमपूज्य सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांचे व श्रीदत्त परंपरेचे शुभ आशीर्वाद अखेर फळास आले. अनेक दानशूर, समाजधुरीण, ज्ञात व अज्ञात बंधू व भगिनी आणि हितैषी सज्जन व अनेक सेवापरायण संस्थांच्या सहकार्याने व परमपूज्य सद्गुरु श्री.मामांचे उत्तराधिकारी शिष्योत्तम परमपूज्य सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे व परमपूज्य सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांच्या महत्प्रयासाने अखेर आळंदीत एक जागा मिळाली व ‘श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय’ व ‘श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवना’ची स्वतःची वास्तू २०१८ साली उभी राहिली. आज परंपरेतील पुढील अधिकारी विभूती परमपूज्य सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा आगटे यांच्या कुशल मागदर्शनाखाली ‘श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवना’चे व ‘श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठा’चे कार्य जोमाने सुरू आहे. दिनांक १५ ऑक्टोबर १९७३ रोजी पुण्यातील धर्मादाय आयुक्त कचेरीत नोंदणी झालेल्या संस्थेच्या घटनेनुसार संस्थेची मूळ उद्दिष्टे पुढे दिलेली आहेत.
परमपूज्य सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षी सिद्धबेट प्रकल्पाची प्रतिकृती
१) श्रीक्षेत्र आळंदी येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधिस्थानापासून जवळच सिद्धबेट नावाचा तपोवनाचा परिसर इंद्रायणी नदीचे काठी आहे. सदरहू परिसर ‘पावन तपोवन’ म्हणून सुप्रसिध्द आहे. सदरहू तपोवनातच श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या मातापित्यांचे वास्तव्य होते व या पवित्र तपोवन भूमीतच श्रीनिवृत्तिनाथ, श्रीज्ञानदेव, श्रीसोपानदेव व श्रीमुक्ताबाई यांचा जन्म झाला व बालपण गेले. या तपोवन भूमीपैकी इंद्रायणी सिद्धबेट परिसरातील सुमारे १०० एकर जमीन संपादन करणे व उद्देश (खालील) पोट कलम २ ते १० मध्ये लिहिलेल्या कामासाठी एक राष्ट्रीय स्मारक म्हणून तेथे तपोवन निर्माण करणे.
२) श्रीज्ञानदेवांच्या अध्यात्म व तत्त्वज्ञानाचा शांत व पवित्र तपोवनाच्या वातावरणात अभ्यास, मनन व चिंतन व्हावे, अधिकारी थोर व्यक्तींच्या सान्निध्यात व त्यांचे मार्गदर्शनाखाली सर्व थरातील साधकांना त्यांच्या भूमिकेवरून व अवस्थेतून प्रगती व्हावी, अशी साधना करता यावी. नीती, सदाचार, प्रेम, बंधुभाव व मानवतेची जीवनातील मूल्ये व चारित्र्य यांची वाढ व्हावी, त्या कामी प्रेरणा व शक्ती मिळावी व त्याचा समाज जीवनावर प्रभाव पडावा.
३) सर्व संतवाङ्गमयाचा सखोल, तौलनिक अभ्यास व्हावा. त्यांच्या तत्त्वज्ञानाची शिकवण, जीवन कसे उन्नत करू शकेल, याचे चिंतन व मनन व्हावे व त्याकरिता संशोधन करणे.
४) समाज-जीवनावर प्रभाव पाडू शकतील, असे चारित्र्यवान, ध्येयनिष्ठ व तळमळीचे लोकसेवक व धर्म प्रचारक तयार करून त्यांच्या द्वारा मानव जातीची अभ्युदय व निःश्रेयस यांचेकडे वाटचाल व्हावी.
५) निरनिराळ्या विद्यापीठांतून अध्यात्म विषयास प्राधान्य मिळवून देऊन त्याच्या शिक्षणाची व अभ्यासाची सोय व्हावी, अखिल भारतीय विद्यापीठात संतवाङ्गमयाच्या अभ्यासास अग्रक्रम प्राप्त व्हावा व विज्ञानाबरोबरच अध्यात्मानेच समाज जीवन सफल व समृद्ध होणार आहे, याबद्दलचा प्रचार करावा.
६) महाराष्ट्रातील विद्यापीठांत श्रीज्ञानेश्वरी व महाराष्ट्रीय संतवाङ्गमयाचा सर्व बाजूंनी पध्दतशीर, सखोल अभ्यास व्हावा व त्यासाठी विद्यापीठाकडून अध्यासने राखून ठेवण्याची व्यवस्था व्हावी.
७) श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्गमयाचा, तत्त्वज्ञानाचा व तत्संबंधी सर्व जरूर व पोषक अशा पौर्वात्य व पाश्चिमात्य ग्रंथांचा संग्रह करणे व त्यांच्या अभ्यासाची व्यवस्था करणे.
८) संतवाङ्गमयावर व ज्ञानेश्वरीवर अनेक महत्त्वाची भाषणे, प्रवचने, कीर्तने होतात. त्यांच्या ध्वनिमुद्रिका व टेप्स् यांचा संग्रह करून त्यांचे संगोपन करणे.
९) भागवत धर्म व सर्व संप्रदाय व वारकरी शिक्षण यांच्या उच्च आदर्शाला व वैचारिक बैठकीला पोषक व योग्य असे नामसप्ताह, कीर्तने, प्रवचने, अभ्यास मंडळे, परिसंवाद, भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना पोषक संमेलने भरविणे वगैरे कार्यक्रम करणे.
१०) सदरहू ध्येय व उद्देश यांना पोषक व त्यांच्या वाढीसाठी जे जे योग्य असे करावे लागेल, ते ते सर्व करणे.
प. पू. सद्गुरु योगिराज श्री. श्री. द. (मामा) देशपांडे महाराज
श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन, ज्ञान-योग-अध्यात्म विद्यापीठ प्रतिष्ठान, आळंदी