

॥ श्री ॥
पुणे केंद्रात झालेल्या श्रावणमास अनुष्ठान सन २०२५ चा वृत्तांत

सन २०२५ च्या श्रावणमास अनुष्ठानकालात, प्रत्येक रविवारी सकाळी सात वाजता ‘श्रीपाद निवास’ येथे सामुदायिक साधना, त्यानंतर सामुदायिक पारायण-सेवा तसेच प्रथम रविवारी सामुदायिक ‘श्रीदत्तभावांजली’ स्तोत्रपठण आणि नामजपाचे आयोजन करण्यात आले होते. ‘जय जय करुणामूर्ति दयाळा जय जय श्रीपादा’, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ आणि ‘श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ या महामंत्रांचा प्रत्येकी पंधरा मिनिटे जप करण्यात आला व तदनंतर आरती व मंत्रपुष्पांजली असा कार्यक्रम संपन्न झाला.
संक्षिप्त चलतचित्र
प्रवचन सेवा

विशेष पर्वणी म्हणजे श्रावण महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रविवारी प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांची प्रवचन-सेवा संपन्न झाली. त्यांनी प.प.श्री. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित ‘श्रीदत्तमाहात्म्य’ या ग्रंथामधील खालील ओवी प्रवचन-सेवेसाठी घेतली होती.

शास्त्रे परमार्थप्राप्तीच्या मार्गात बाधक ठरत नाहीत. कोणत्याही शास्त्रानुसार केलेले प्रयत्न जीवाला क्रमाने भगवत्प्राप्तीकडे घेऊन जातात. ‘मनोमार्गें गेला तो येथें मुकला । (हरि.पा. १८.३)’, मनाच्या मार्गाने जाण्याच्या रस्त्यामध्ये दुःख व कष्ट आहेत तर शास्त्रे ही दिव्याप्रमाणे मार्गदर्शन करणारी असतात. साधकाने सद्गुरुवचन-पालन, शास्त्रांनुसार आचरण आणि उपासना असे एकत्रित प्रयत्न केले तर प्रज्ञा जागृत होऊन ज्ञानप्राप्ती होईल आणि त्यायोगे साधकाला परब्रह्मस्वरूप जाणता येईल.
‘कर्म तशी बुद्धी, बुद्धी तसा प्रयत्न, प्रयत्न तसा अनुभव’; असे असले तरीही शास्त्रांनुसार केलेल्या प्रयत्नांनी प्राक्तनावरही मात करता येते आणि अशा प्रयत्नांनीच योग आणि बोध पूर्ण होतात. ‘शास्त्र म्हणजे काय ?’ हे वेद, मीमांसा आणि भक्तीच्या अंगाने अधिक विस्ताराने सांगताना श्री ज्ञानेश्वरी, श्री योगवसिष्ठ व श्री एकनाथी भागवत यांचा संदर्भ देऊन प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी साधकाला परब्रह्मप्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या ‘शम’, ‘दम’, ‘तितिक्षा’, ‘समाधान’, ‘उपरती’ आणि ‘श्रद्धा’ या सहा गुणांचे विवरण केले.
शास्त्रानुसार प्रथम गुण ‘शम’ याबद्दल अधिक विस्ताराने सांगताना प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा म्हणाले की, मनावर संयम ठेवून वैराग्याच्या आधारे आणि सद्गुरुवचनानुसार वृत्ती ठेवून देहाची तीन चिमट्या राख होईपर्यंत साधना करत राहणे हे साधकाचे प्रमुख कर्तव्य आहे. दुसरा गुण ‘दम’ हा मुख्यतः कर्मेंद्रियांशी निगडित असून, ‘देहाच्या आवश्यकतेपुरते इंद्रियांना द्यावे आणि अहोरात्र वैराग्याने त्यांना आवरून ठेवावे’ असा आहे.
संतांची सहनशीलता हीच त्यांची ‘तितिक्षा’ असते. प.पू.सद्गुरु श्री. मामांपाशी पराकोटीची सहनशीलता आणि शांती होती. आज आपण ‘माउली’त अशाच प्रकारच्या शांतीचा अनुभव घेतो. ‘उपरती’ या पुढील गुणासाठी विवेकयुक्त वैराग्य हवे. बुद्धीला विवेकाची जोड असेल तरच प्रगल्भता येते आणि अज्ञान कमी होऊन ज्ञान वाढते.
आपणास आपण स्वतः जेवढे आवडतो तेवढेच प्रेम श्रीसद्गुरूंवर करता यायला हवे.’ सद्गुरूंवरचे आत्यंतिक प्रेम म्हणजेच भक्ती. या भक्तीनेच सर्वत्र भगवंत दिसून आतला आनंद, समाधान आणि अखंड संतोष प्राप्त होतो. सद्गुरूंवरील भक्तियुक्त विश्वास याचेच नाव ‘श्रद्धा’. हीच श्रद्धायुक्त भक्ती वणव्याप्रमाणे क्रियमाण आणि संचित जाळते. हे सहा गुण श्रीभगवंत आणि श्रीसद्गुरु यांच्या ठायी नित्य आणि परिपूर्णतेने वसत असतात. विविध संदर्भ आणि कथा यांच्या आधारे, परमार्थास आवश्यक असणारे हे गुण प.पू.सद्गुरु श्री. अनिरुद्धदादांनी दोन्ही प्रवचनांतून विस्तृत स्वरूपामध्ये विशद केले.
दोन्ही रविवारी झालेल्या प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या या अत्यंत बोधप्रद, रसाळ प्रवचन-सेवेनंतर अतिशय भारावलेल्या वातावरणात आरती व मंत्रपुष्पांजली संपन्न झाली. त्यानंतर सर्व साधकजन सद्गुरु-दर्शन आणि तीर्थप्रसाद घेऊन स्वस्थानी परतले.
अनुष्ठानातील काही क्षण चित्रे










