

॥ श्री ॥
श्रीक्षेत्र जळगांव (जामोद) येथे संपन्न झालेल्या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जयंती महोत्सवाचा वृत्तांत

भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जयंती महोत्सवाचा मुख्य सोहळा ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या श्रीक्षेत्र जळगांव (जामोद) या प्रकल्पस्थानी प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांच्या आणि प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या परममंगल उपस्थितीत प्रतिवर्षी संपन्न होत असतो. या वर्षी हा उत्सव भाद्रपद शुद्ध ४ श्रीशके १९४७, मंगळवार व बुधवार दिनांक २६ व २७ ऑगस्ट २०२५ असे दोन दिवस प्रकल्पस्थानी आनंदमय व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. या महोत्सवासाठी पुणे, मुंबई, कऱ्हाड, नागपूर, भिलाई, कोल्हापूर, आंबेरी, अकोला, अमरावती, गोवा अशा मंडळाच्या विविध केंद्रांतून अनेक साधक-सज्जन आवर्जून उपस्थित होते.
महोत्सवाच्या आदल्या दिवशीपासूनच मंदिराचा संपूर्ण परिसर फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आला होता. सोमवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता प.पू.सद्गुरु श्री.दादांचे प्रकल्पस्थानी शुभागमन झाले. प्रकल्पस्थानी आल्यावर प्रथम प.पू.सद्गुरु श्री.दादांनी प्रेमभराने श्रीभगवंतांचे दर्शन घेतले. प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांचे सुद्धा याच रात्री साडेअकरा वाजता प्रकल्पस्थानी शुभागमन झाले.
संक्षिप्त चलतचित्र
२६ तारखेला दुपारी अडीच ते साडेतीन या वेळेत स्थानिक महिला भजनी मंडळाने श्रीसद्गुरुचरणीं भजन-गायनाची सेवा रुजू केली. त्यामध्ये त्यांनी ‘तूच सूर द्यावा मजसी’, ‘तू गुरु ही तुझी आरती’, ‘मूळपीठवासिनी’, ‘रामनामाचे अमृत’, ‘छम छम नाचे देववीर हनुमान’, ‘दिगंबराला नमन करू’, ‘गौरीहरा गंगाधरा’, ‘राष्ट्रसंत तुम्ही’ यांसारखी अनेक पदे सादर केली. सुश्राव्य अशी भजनसेवा श्रीभगवंतांच्या श्रीचरणीं रुजू केल्याबद्दल मंडळाच्या वतीने सौ.प्रतिमाताई आगटे यांच्या हस्ते भजनी मंडळाच्या अध्यक्षा सौ.अर्चना पुराणिक यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना संवादिनीची साथ करणारे श्री.अजय पुराणिक व तबल्याची साथ करणारे श्री.मुकुंद रोटे यांचाही सौ.प्रतिमाताईंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर ‘अन्नपूर्णा’ इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सव्वापाच वाजता ‘श्रीदत्तभावांजली’ स्तोत्राचे सामूहिक पठण झाले व तत्पश्चात् काही साधकबंधूंनी अभंग-गायनसेवा श्रीभगवंतांच्या श्रीचरणीं रुजू केली. त्यामध्ये ‘गुरुजी मैं ना जानू जोग’, ‘कंठी राहो नाम हा माझा नवस’, ‘लक्ष्मीवल्लभा दीनानाथा’, ‘धीरे धीरे सब होय’, ‘साऱ्या पुण्याची पुण्याई’, ‘सहा भुजा सिद्धासन’, ‘संतचरण रज लागता सहज’, ‘श्रीसंतांचिया माथा चरणांवरी’ यांसारखे सुंदर अभंग साधकांनी सादर केले. त्यानंतर नेहमीप्रमाणे सायंकाळची आरती व नित्योपासना होऊन सर्वांनी अल्पोपाहाराचा लाभ घेतला. रात्री नऊ ते दहा या वेळेत साधकबंधूंनी श्रीहरिपाठ-गायनसेवा श्रीभगवंतांच्या श्रीचरणीं समर्पित केली. सर्व उपस्थित साधकही या सेवेत उत्साहाने सहभागी झाले होते. या भावपूर्ण अशा श्रीहरिपाठ-गायनसेवेने पहिल्या दिवसाचे कार्यक्रम समाप्त झाले.
बुधवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता पुण्याचे साधकबंधू कीर्तनरत्न ह.भ.प.श्री.चिन्मय देशपांडे यांनी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या जन्मकाळाच्या कीर्तनसेवेस प्रारंभ केला. सेवेसाठी त्यांनी पूर्वरंगात श्री.गोविंदबुवा होशिंग यांचे ‘हरिसी सतत स्मरावे, मनुजा । दुर्लभ हा नरदेह जाणुनी, क्रोधादिक वर्जावे ॥’ हे पद घेतले होते. प.पू.सद्गुरु श्री.मामा, प.पू.सद्गुरु सौ.ताई आणि प.पू.सद्गुरु श्री.दादा यांच्या विविध ग्रंथांतील दाखले देऊन त्यांनी स्मरणाचे अलौकिक व लौकिक प्रयोजन सांगितले. स्मरणाविषयी सांगत असताना, प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या ‘जयांचें केलिया स्मरण’ या ग्रंथाचा आधार घेत स्मरणाची प्रयोजने आणि वैशिष्ट्ये त्यांनी विशद केली. तसेच प.पू.सद्गुरु श्री.वा.द.गुळवणी महाराजांच्या कथेचा आधार घेत ‘स्मरण कसे असावे ?’ याबद्दल सांगून ‘‘आपल्या सद्गुरु-परंपरेतील सर्वच महात्मे हे उपासनेचे उत्तुंग हिमालय आहेत’’, असे त्यांनी नमूद केले. उत्तररंगामध्ये श्री.अपळराज आणि सौ.सुमतीदेवी यांच्या गृही श्रीभगवंत कसे जन्मास आले ही कथा विविध कीर्तनी-पदांच्या साह्याने त्यांनी उत्तम रंगवली. ठीक सूर्योदयसमयी मंगल वाद्यांच्या घोषात भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जयजयकार करून व श्रीचरणीं गुलाल-पुष्पे अर्पण करून जन्मकाल साजरा करण्यात आला. त्या वेळी मुळातच अतिशय लोभस असणारी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची मूर्ती अतिशय सुंदर व प्रसन्न दिसत होती. सुश्रवणीय अशी कीर्तनसेवा श्रीभगवंतांच्या चरणीं रुजू केल्याबद्दल श्री.चिन्मय देशपांडे यांना प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या हस्ते शाल-श्रीफळ व मानधन रूपाने प्रसाद देण्यात आला. त्याचबरोबर त्यांना संवादिनीची साथ करणारे श्री. श्रेयस पाटील, तबल्याची साथ करणारे श्री.चैतन्य देशपांडे, पखवाजाची साथ करणारे श्री.मनोज भांडवलकर यांनाही प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या हस्ते श्रीफळ व मानधन-प्रसाद देण्यात आला.
सकाळी आठ ते नऊ या वेळेत ‘अन्नपूर्णा’च्या चौथ्या मजल्यावर सामुदायिक साधना झाली. त्यानंतर सर्वजण ज्याची अतिशय आतुरतेने वाट पाहात होते त्या प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या प्रवचन-सेवेला सकाळी साडेदहा वाजता प्रारंभ झाला.
श्रीज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातील पहिली ओवी प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी सेवेसाठी घेतली होती. रसाळ आणि गोड अश्या ह्या नमनाच्या ओवीचे निरूपण करताना त्यांनी ओवीतील प्रत्येक विशेषणामागे दडलेला गहन अर्थ विषद करून सांगितला. प्रत्येक शब्द कशा पद्धतीने श्रीमाउलींच्या अंतःकरणात त्यांच्या सद्गुरुंप्रती असलेला भाव व्यक्त करतोय, हे त्यांनी खूप सोप्या शब्दात आणि अनेक दाखले देऊन समजावून सांगितले.
बाराव्या अध्यायामध्ये ज्ञानकांडाची सुरुवात होत असल्या कारणाने श्रीमाउली इथे आपल्या आराध्य सद्गुरूंचा जयजयकार करीत आहे. विषयरुपी संसाराच्या पाशातून साधकाला बाहेर काढण्याचे सामर्थ्य केवळ आणि केवळ सद्गुरुंमध्येच आहे. त्यांच्या कृपादृष्टीनेही ह्या पाशातून साधक मुक्त होतात. अशा ह्या सामर्थ्यशाली कृपादृष्टीचा आणि सद्गुरूंचा पहिला जयजयकार आहे. पुढचा जयजयकार हा अखंड सात्विक विवेकाचे भांडार अशा ज्ञानदात्या सद्गुरुंचाच आहे. अनुग्रहाच्या माध्यमातून साधकातील सात्विक विवेक जागृत कारण्याचे सामर्थ्य ते राखतात म्हणून हा जयजयकार आहे.
‘शुद्ध’ या शब्दाबद्दल प.पू.श्री दादांनी सांगितले की, “परब्रह्म हेच सत्य आहे, आणि त्यातील ‘शुद्ध’ भाग म्हणजेच भगवती शक्ती! सगुण स्वरूपात श्रीसद्गुरु आणि निर्गुण स्वरूपात भगवती शक्ती — हेच ‘शुद्ध’असून, त्यांच्या जयजयकारात हाच भाव सामावलेला आहे. त्रिगुणांतील दृष्टी ही अशुद्ध असते; तर शुद्ध दृष्टी ही त्रिगुणांच्या पलीकडे असते. आपल्या श्रीसद्गुरूंची दृष्टी ही शुद्ध असल्याने त्यांचा जयजयकार असो.”
‘देहात राहून शुद्धता कशी अनुभवता येते ?’ याचे उदाहरण देताना प.पू.श्री दादांनी प.पू सद्गुरु श्री मामांबद्दल सांगितले की, “सामान्य माणसाला दुसऱ्याच्या दुःखात समाधान मिळते, तर सद्गुरु श्री मामांसारखे महात्मे दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होऊन तो आनंद द्विगुणीत करतात. याचे कारण असे की, सामन्यांचे हात घेण्यासाठी पुढे येतात आणि महात्म्यांचे हात नेहमी देण्यासाठी पुढे असतात. म्हणून अशा महात्म्यांचा, माझ्या श्रीसद्गुरूंचा जयजयकार असो.”
सूक्ष्म शुद्धतेबद्दल बोलताना प.पू.श्री दादांनी सांगितले की, प.पू सद्गुरु श्री मामांच्या देहातून अखंड सुगंध प्रकट होत असे. ते अंतरबाह्य शुद्ध चैतन्याचे मूर्तिमंत स्वरूप होते. म्हणून त्यांचा जयजयकार असो! सामान्य मनुष्य त्रिगुणांच्या बंधनात अडकलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये काम, क्रोध आणि अशुद्ध चित्त यांचा प्रभाव राहतो. त्यामुळे त्याचे ज्ञानही अशुद्धच असते. परंतु श्रीसद्गुरूंना त्रिगुणांचे बंधन नसल्यामुळे त्यांचे ज्ञान शुद्ध असते. प्रवचनाच्या शेवटी शुद्ध या शब्दाचा आणखी एक अर्थ सांगताना प.पू.श्री दादा म्हणाले, आपले श्रीसद्गुरु अशुद्ध जीवांनासुद्धा केवळ प्रेमापोटी प्रायश्चित्ताशिवाय सांभाळतात! म्हणून त्यांचा जयजयकार असो!
या बोधप्रद, रसाळ प्रवचन-सेवेनंतर आरती व मंत्रपुष्पांजली होऊन दुपारी साडेबारा ते अडीच या वेळेत सर्व उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सायंकाळी ४ वाजता सुरू होणाऱ्या देवांच्या पालखी-सोहळ्यासाठी साधकांनी फुले, माळा इत्यादींनी पालखी सुशोभित केली. चंद्र-सूर्यचिन्हांकित छत्र-चामरे, चवऱ्या, दिवटी तसेच टाळ, मृदंग, संवादिनी इत्यादी वाद्यांसहित पालखी-सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली. प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी श्रीभगवंतांच्या पादुका व प्रतिमा यांची पालखीत स्थापना केली. प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या उपस्थितीत, ‘धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची’ या अभंगाने पालखी-सोहळ्याला प्रारंभ झाला. संपूच नये असे वाटणारा हा पालखी-सोहळा प्रत्येक थांब्यावर विविध पदे, अभंग, ‘करुणात्रिपदी’ गाऊन तीन प्रदक्षिणांसह संपन्न झाला. तब्बल दोन तास चाललेल्या या पालखी-सोहळ्यानंतर आरती व तीर्थप्रसाद झाला. त्यानंतर अल्पोपाहार घेऊन परगांवहून आलेल्या साधक बंधुभगिनींनी स्थानिक स्वयंसेवकांचा प्रेमाने निरोप घेतला.
त्यानंतर प्रकल्पस्थानी उपस्थित असणाऱ्या साधकांशी प.पू.सद्गुरु श्री. शिरीषदादांनी रात्री अनौपचारिक चर्चा केली. त्या वेळी त्यांनी त्यांच्या बालपणीच्या काही रम्य आठवणी सांगितल्या. या प्रसंगी प.पू.श्री. दादांनी, ‘‘आजचा उत्सव खूप छान झाला’’, असे सांगून समाधान व्यक्त केले. त्याच वेळी त्यांनी सांगितले की, ‘‘आज पालखी खूप जड झाली होती. मी पालखी उचलली नाही परंतु ती जड झाली आहे, असे मला जाणवत होते. सगळी ‘मालक मंडळी’ आज पालखीत विराजमान होती!’’
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांसोबत अनौपचारिक चर्चा झाली. साधकांच्या काही शंकांचे निरसन करताना पुन्हा एकदा त्यांनी, ‘अभ्यास कसा करावा ? व कसा वाढवावा ?’ याविषयी मार्गदर्शन केले. ‘‘मराठी वाङ्मयात ‘श्री ज्ञानेश्वरी’ व संस्कृतमध्ये ‘श्री योगवासिष्ठ’ हे सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहेत’’, असे या वेळी प.पू.श्री.दादांनी सांगितले. सद्गुरु श्री माउलींची प्रत्येक ओवी ही नित्यनूतन आहे व प्रत्येक वेळी त्यातून नवीन अर्थ प्रत्ययाला येतो, याचे उदाहरण सांगताना त्यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला. प.पू.सद्गुरु श्री. मामांच्या आज्ञेने श्री.देशमुख महाराजांच्या माडीत ज्या वेळी त्यांनी पहिली प्रवचन-सेवा केली होती तेव्हा सहाव्या अध्यायातील,
ही ओवी सेवेला घेतली होती. ‘आता उद्या आपण दुसऱ्या ओवीवर बोलू’ असा विचार त्यांनी त्या वेळी केला. पण प्रत्यक्षात ज्या वेळी दुसऱ्या दिवशी त्यांनी प्रवचन-सेवेला सुरुवात केली त्या वेळी आतून त्यांना त्याच ओवीचा आणखी नवीन अर्थ उलगडला व त्यावर ते बोलले. असे सतत सहा महिने रोज एक तास ते त्याच ओवीवर बोलत होते. ‘‘आपण जेवढे एखाद्या ओवीचे अधिक चिंतन करू तेवढे तिचे नवनवीन अर्थ आतून उलगडत जातात. म्हणूनच आपण सर्व साधकांनी ‘श्री ज्ञानेश्वरी’ला शरण जाऊन तिचा अभ्यास करावा. अर्थातच सद्गुरु श्री माउलींची कृपा झाल्याशिवाय हे अशक्य आहे’’, असे सुद्धा त्यांनी या वेळी सांगितले.
प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा आणि प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या पावन सान्निध्याचा लाभ मिळाल्यामुळे सर्वच साधकभक्त अत्यंत आनंद व कृतार्थता अनुभवत होते. दोन दिवस चाललेला हा भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जयंती महोत्सव श्रीसद्गुरूंच्या असीम करुणाकृपेने उत्तम रीतीने संपन्न झाला.
उत्सवातील काही क्षण चित्रे
